मराठी साहित्यात अजरामर झालेल्या ‘ययाती’, ‘स्वामी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘पानिपत’, ‘मृत्युंजय’, ‘पार्टनर’, ‘शाळा’, ‘बटाटय़ाची चाळ’ या आणि अशा असंख्य पुस्तकांच्या पायरेटेड प्रती सध्या मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांतील पदपथावर पसरली आहेत. मराठीतील दिग्गज प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकांच्या पायरेटेड प्रतींना चांगली मागणी असून त्यामुळे लेखक आणि प्रकाशन संस्थांचे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे मराठी साहित्याला लागलेल्या या पायरसीच्या वाळवीचे साधे भानही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला नाही. त्यामुळे पायरसीच्या गंभीर मुद्दय़ावर साधे चर्चासत्र आयोजित करण्यासही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वेळच नाही.
दुय्यम दर्जाची छपाई आणि बांधणी असलेल्या या पायरेटेड पुस्तकांचा सुळसुळाट सध्या मुंबईतील रेल्वे स्थानकांबाहेर झाला आहे. हे विक्रेते मूळ किमतीपेक्षा ५० टक्के कमी किमतीत ही पुस्तके विकली जातात. त्यांना ही पुस्तके ‘डुप्लिकेट’ आहेत का, असे विचारले असता बिनधास्त होकारार्थी उत्तर मिळते. ही पुस्तके कुठून आणता, असे विचारल्यानंतर, ‘आमचा शेठ आम्हाला पुरवतो’, असे चर्चगेट, दादर आणि ठाणे स्थानकांबाहेर पायरेटेड पुस्तके विकणाऱ्या विक्रेत्यांनी सांगितले. या शेठचा संपर्क क्रमांक विचारला असता, ‘शेठ कधीच नंबर देत नाही. तो संध्याकाळी पैसे घ्यायला येतो’, असे या तीनही ठिकाणच्या विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे या पायरसीमागे एकच एक टोळी असल्याचा संशय आहे. ठाण्यात तर स्थानकाबाहेर अशा पायरेटेड पुस्तकांचे एक दुकानच उघडण्यात आले आहे. याबाबत विविध प्रकाशन संस्थांना विचारले असता, प्रसिद्ध आणि लोकप्रिय पुस्तकांची पायरसी झाल्यामुळे आम्हाला मोठय़ा प्रमाणात फटका बसतो, अशी कबुली त्यांनी दिली. मात्र याचा फटका लेखक आणि प्रकाशकाला बसतो, असे पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या सुनील मेहता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या पायरसीविरोधात आपण पुण्यात मोठी मोहीम राबवली होती. तसेच पोलिसांत तक्रारही केली होती. पण पुस्तकाची पायरसी म्हणजे अफू किंवा चरसची विक्री नाही. त्यामुळे पोलिसांनी ही तक्रार गंभीरपणे घेतली नाही, असे ते म्हणाले. पायरेटेड मराठी पुस्तकांमध्ये मौज प्रकाशनाचीही अनेक पुस्तके आहेत. याबाबत ‘मौज’च्या मुकुंद भागवत यांना विचारले असता, आम्ही आधीच कारवाईचे पाऊल उचलले आहे. मात्र आत्ताच त्याबाबत बोलणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले. पायरसीचा सर्वात मोठा फटका साहित्यिकांना बसत आहे. प्रकाशन संस्था प्रत्येक लेखकाला विकल्या गेलेल्या एका प्रतिमागे मोबदला देते. त्यामुळे अशा प्रकारे पायरेटेड प्रति विकल्या जात असतील, तर त्याचा थेट परिणाम लेखकाच्या मोबदल्यावर होतो. त्यामुळे आगामी साहित्य संमेलनात याविषयी काही परिसंवाद, चर्चासत्र किंवा ठोस पावले उचलली जाणार का, या प्रश्नाला नुकतेच निवडून आलेल्या संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी नकारार्थी उत्तर दिले. साहित्य संमेलनाचे कार्यक्रम महामंडळातर्फे आधीच ठरलेले असतात. हे कार्यक्रम जाहीर झाले आहेत. त्यामध्ये बदल करता येणार नाही. पण ऐनवेळचा विषय म्हणून कदाचित याचा समावेश करता येईल, असे ते म्हणाले. पायरसीबाबत चर्चासत्र किंवा गंभीर कारवाई करण्यात यावी, असा ठराव एखाद्याने मांडल्यास आम्ही हा विषय समाविष्ट करू शकतो, असे महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी सांगितले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा