गेल्या काही वर्षांपासून मराठी रंगभूमीवर जुन्याची नवी लाट आली असून या प्रवाहात सगळेच निर्माते आपल्या नाटय़संस्थेची घागर भरून घेत आहेत. मराठी रंगभूमीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या काळातील अनेक नाटके नव्याने येण्याचा ट्रेंडही आता जुना झाला असून, याच पठडीतील दोन नाटके ऑक्टोबर महिना गाजवणार आहेत. गेल्या महिन्यात रसिकांच्या भेटीला आलेल्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे दमदार प्रयोग सुरू असून १६ ऑक्टोबर रोजी श्री. ना. पेंडसे यांचा ‘गारंबीचा बापू’ही रसिकांच्या भेटीला येत आहे.
मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. योगायोग म्हणजे पेंडसे यांचे ‘गारंबीचा बापू’ हे नाटक याच वर्षी येत आहे. डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी अजरामर केलेली ‘बापू’ची भूमिका अंगद म्हैसकर, तर ‘राधा’ची भूमिका शीतल क्षीरसागर करीत आहे. या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा संजय वढावकर यांनी खांद्यावर घेतली आहे. तर मूळ चार अंकी असलेल्या या नाटकाची दोन अंकी रंगावृत्ती मिलिंद पाठक यांनी अतिशय अभ्यासूपणे तयार केली आहे. सुशीला एन्टरटेन्मेण्टच्या बॅनरखाली येणाऱ्या या नाटकाची निर्मिती मनोज कोरे यांनी केली आहे.
श्री. ना. पेंडसे यांच्या कलाकृतीवर नाटक करणे, हे आव्हानात्मक होते. मात्र पेंडसे यांच्या भाषेने आम्हा सर्वानाच भूरळ पाडली, असे वढावकर यांनी स्पष्ट केले. तर डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी अजरामर केलेली ‘बापू’ची भूमिका साकारण्याचा सन्मान आपल्या वाटय़ाला आला आहे. मात्र आपण त्याचे कोणतेही दडपण घेतले नसल्याचे अंगद म्हैसकर याने स्पष्ट केले. शीतलच्या मते पेंडसे यांनी शब्दबद्ध केलेली ‘राधा’ हे या नाटकाचे बलस्थान आहे.
मराठी रंगभूमीच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या ‘नाटय़संपदा’ची धुरा अनंत पणशीकर यांच्या हाती आल्यापासून त्यांनी अनेक नाटके पुनरुज्जीवित करण्याचा सपाटा लावला आहे. त्याच माळेतील आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून उतरलेल्या सदाबहार ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचा मुहूर्त १३ ऑगस्टला करण्यात आला होता. त्यानंतर अशोक मुळ्ये यांच्या घरी वाचनाचाही मुहूर्त करण्यात आला. हे नाटक १६ सप्टेंबर रोजी रसिकांसमोर आले. मात्र सप्टेंबरमध्ये मोजकेच प्रयोग झालेल्या या नाटकाने ऑक्टोबरमध्ये आपल्या इनिंगची खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे. त्यामुळे नाटय़सृष्टीसाठी ऑक्टोबर महिना हा ‘बापू’ आणि ‘बेडी’मय ठरणार आहे. 

Story img Loader