टीव्ही मालिकांमधून रमाबाई रानडे यांच्या भूमिकेत गाजलेली अभिनेत्री स्पृहा जोशी हिच्या ‘मोरया’मधील भूमिकेचे कौतुक झाले होते. आता रमेश मोरे दिग्दर्शित ‘सूर राहू दे’ या चित्रपटाद्वारे स्पृहा चित्रपट रसिकांसमोर ६ डिसेंबर रोजी झळकणार आहे.
एचआयव्ही आणि एड्सविषयक जनजागृतीपर चित्रपट अनेक येऊन गेले असून एड्स या रोगाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने कमी होण्याच्या मार्गावर असताना या विषयावर चित्रपट करावासा का वाटला या प्रश्नावर बोलताना दिग्दर्शक रमेश मोरे म्हणाले की, एड्सविरोधी जनजागृती करण्यासाठी हा चित्रपट केलेला नाही. एड्सचे प्रमाणही खूप कमी होते आहे हे खरे आहे. परंतु, एचआयव्हीची लागण होणे आणि एड्स हा रोग होणे यात खूप फरक आहे. त्याचबरोबर जनजागृतीचा टप्पा आपल्या देशाने किंवा जगानेही ओलांडला आहे. एड्सचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या मार्गावर असताना एचआयव्ही लागण झालेल्या लोकांचे जगणे, त्यांचे मनोबल वाढविण्याबरोबरच जो सगळ्यात महत्त्वाचा घटक रक्तातील ‘सीडीफोर काऊण्ट’ कायमस्वरूपी आटोक्यात ठेवणे, समाजाकडून मिळणारी वागणूक हे प्रश्न अजूनही आहेतच आणि एचआयव्ही बाधित व्यक्ती म्हणजे एड्सबाधित नव्हे हेही ठसविण्याचा प्रयत्न करायचा होता, म्हणून ‘सूर राहू दे’ हा चित्रपट केला असे रमेश मोरे यांनी नमूद केले.

Story img Loader