‘मुले ही देवाघरची फुले’ हा साने गुरुजींचा संदेश मराठी चित्रपटसृष्टी सध्या तंतोतंत पाळत आहे. समाजातल्या विविध स्तरांमधील या ‘देवाघरच्या फुलांच्या’ आयुष्याचे, त्यांच्या समस्यांचे चित्रण करणारे एकामागोमाग एक अनेक चित्रपट गेल्या काही महिन्यांत मराठीत आले आहेत. याच धर्तीवर आधारित एक नवीन चित्रपट नोव्हेंबर अखेरीस प्रदर्शित होत आहे. ‘आयना का बायना’ असे या चित्रपटाचे नाव असून तो बाल सुधारगृहातील मुलांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षांवर आधारलेला आहे.
गेल्या मे महिन्यात बच्चे कंपनीला खूश करण्यासाठी श्रीरंग गोडबोले यांनी ‘चिंटू’ हा चित्रपट प्रदर्शित केला. एका वृत्तपत्रातील ‘चिंटू’ या ‘कार्टून कॅरेक्टर’वर आधारित या चित्रपटात उच्च मध्यमवर्गीय घरातील लहान मुलांचे भावविश्व साकारले होते. त्यानंतर दिग्दर्शक रमेश मोरे यांचा ‘चॅम्पियन्स’ हा चित्रपटही दोन लहान मुलांच्या शिकण्याच्या समस्येवर आधारित होता. या चित्रपटात झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि अपघाताने अनाथ झालेल्या, पण स्वाभिमान जपून शिकण्याची इच्छा असलेल्या दोन मुलांची गोष्ट मांडण्यात आली होती. त्यानंतर अगदी काही दिवसांपूर्वी ‘नाइट स्कूल’ या चित्रपटातही रात्रशाळेत शिकणाऱ्या मुलांच्या आणि रात्रशाळेच्या समस्यांचे चित्रीकरण करण्यात आले होते.
आता प्रदर्शित होणाऱ्या ‘आयना का बायना’ या चित्रपटात बाल सुधारगृहातील मुले, त्यांची नृत्याच्या स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा, समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्या मार्गातील समस्या यांचे चित्रण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विविध नृत्य स्पर्धामध्ये भाग घेऊन त्यात जिंकणारी काही मुले यातील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच या चित्रपटात बी-बॉइंग, रॉक वगैरे नृत्यप्रकारही बघायला मिळणार आहेत. हिंदीतील अभिनेता राकेश बापट पहिल्यांदा मराठी चित्रपटात काम करणार असून त्याच्यासह अमृता खानविलकर, सचिन खेडेकर आणि गणेश यादव हे प्रमुख कलाकार असतील.
‘आयना का बायना’ हा चित्रपट एका नृत्य स्पर्धेभोवती फिरत असल्याने त्याचा शेवट काय होईल, याचा विचार करणे कठीण नाही. मात्र तरीही बाल सुधारगृहातील मुलांचे आयुष्य हा चित्रपट कसा दाखवतो, याकडे अनेकांचे लक्ष आहे.