हा चित्रपट विनोदी आहे, हे नक्कीच! पण तरीही हा चित्रपट काही तरी देऊन जातो. ते काय देऊन जातो, हे सांगण्यासाठी मी खास ‘लोकसत्ता’साठी चित्रपटातील एक प्रसंग सांगेन. एका क्षणापर्यंत सात पूर्वजांचे म्हणणे, ते देत असलेला ताण श्रीरंग देशमुख सहन करतो. पण, एका क्षणी तो ठरवून टाकतो की, ‘बाकी गोष्टी खड्डय़ात गेल्या, पण मी हा वाडा विकून टाकतो.’ अशा वेळी हे सात जण त्याच्यावर तुटून पडतात. मग श्रीरंग प्रत्येक पूर्वजाला सांगतो की, तुम्ही आम्हाला लढायला शिकवत आहात, पण आमच्यात ताकदच नाहीए. मावळा त्याला सांगतो की, ‘तू असा वागलास, तर माघारी गेल्यानंतर महाराजांना काय उत्तर द्यायचं?’ त्यावर भरत उत्तर देतो, ‘त्यांना जाऊन सांगा की, आम्ही गांडूळ आहोत. आमच्याकडे ना ढाली, ना तलवारी. आहेत, त्यापण गंजल्या.’ दुसऱ्या बाजूने गांधीवादी पूर्वज म्हणतो, ‘तुम्हाला सतत शस्त्रे कशाला हवीत? बापूंची शिकवण विसरलात का? शस्त्रांशिवायही लढता येतं.’ त्याला भरत सांगतो, ‘गांधी महान आहेतच, पण त्यांच्या विचारांपेक्षा नोटेवरचे गांधी आम्हाला जास्त महत्त्वाचे वाटतात.’ अशोकाच्या शिपायाकडे जाऊन भरत म्हणतो, ‘सम्राट अशोक आमच्यासाठी महत्त्वाचा नाही राहिला. पण ती भूमिका करणारा शाहरूख खान किती सुंदर दिसतो, याच्याबद्दल चर्चा करण्यात आम्हाला रस आहे.’
वारकऱ्याच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणतो, ‘तुकारामाच्या गाथा इंद्रायणीत बुडवणारी माणसंच होती. पण ती वर आणून देणारा विठ्ठल या जन्मी आम्हाला कुठून मिळणार?’ लावणीवालीला जाऊन सांगतो, ‘परंपरेचे दाखले तुम्ही आम्हाला कसले देत आहात! गल्लोगल्ली होणाऱ्या इव्हेंट्समध्ये परंपरा कशी जपली जाते, हे आम्ही बघतच आहोत.’ संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील वीराला सांगतो, ‘१०५ हुतात्मे झाले, मुंबई महाराष्ट्राला मिळाली.
पण अजूनही मराठी माणसाला कळलंच नाहीए की, आता मुंबई त्याची राहिलेली नाही.’ आदिमानवाकडे जाऊन तो सांगतो, ‘तुम्ही जे जनावरासारखे वागता ते फार कमी वागता. मी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत चांगल्या कपडय़ांत वावरणारी पण तुमच्यापेक्षा जास्त जनावरांसारखी वागणारी माणसे पाहत आहे.’ सगळ्यात शेवटी भरत पुन्हा मावळ्याकडे जातो आणि सांगतो, ‘शिवाजी महाराज जन्माला आले, ही अभिमानाची गोष्ट आहे. पण या घटनेपेक्षा ते कोणत्या महिन्यात जन्माला आले, यात वाद घालण्यात आम्हाला रस आहे. त्यातून एखाद्या वर्षी तो दिवस रविवार आला, तर आम्ही एक सुटी फुकट गेली, म्हणून चुकचुकतो.’
हा प्रसंग विस्ताराने सांगण्यामागचा हेतू एवढाच की हा केवळ विनोदी चित्रपट नाही तर विनोदी शैलीत काहीएक विचार मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झाला आहे. चित्रपटात दाखवलेलले
नायकाचे हे सात पूर्वज त्यांच्या काळातला दृष्टिकोन घेऊन आले आहेत.
पण हा दृष्टिकोन किती चुकीचा आहे, हे नायक त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. मला डेव्हिड धवनचे चित्रपटही आवडतात. पण मी चित्रपट बनवताना राजकुमार हिरानीसारखा चित्रपट बनवेन. असा चित्रपट जो विनोदी असेल, पण त्यात काही तरी अर्थ दडलेला असेल.
ग्राफिक्सचा वापर महत्त्वाचा -केदार शिंदे
‘खो-खो’ हा चित्रपट हा २००३मध्ये आलेल्या माझ्या ‘लोच्या झाला रे’ या नाटकावर आधारित आहे. हे नाटक स्टेजवर न करता ब्रॉडवे स्टाइल भव्यदिव्य करावं, अशी इच्छा होती. पण निर्मात्यांच्या काही अडचणी होत्या. म्हणून मग ते सीमित झालं. नाटकाच्या वेळी मला जे काही भव्यदिव्य करायचं होतं, ते मला चित्रपटात करण्याची मुभा मिळाली. म्हणजे आदिमानव उलटा लटकत येतो, हे मला स्टेजवर दाखवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले असते. किंवा वाडय़ाच्या भिंतीतून घोडा येतो, हे तर मी नाटकात दाखवूच शकलो नसतो. चित्रपटात कम्प्युटर ग्राफिक्सच्या आधारे ते करण्याची मुभा मिळाली. सुदैवाने मला चेतन देशमुख नावाचा खूप चांगला तंत्रज्ञ मिळाला. ‘शिकागो’, ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या चित्रपटांच्या अॅनिमेशन टीममध्ये त्याने काम केलं आहे. आता तो पुण्यात स्थायिक झाला असून तिथे त्याचा स्टुडियो आहे. चेतनने या चित्रपटासाठी खूप उत्तम ग्राफिक्स तयार केले आहेत. म्हणजे वारकरी जमिनीतून वर येताना दिसतो, घोडा भिंतीतून उडी मारून बाहेर येताना दिसतो. किंवा सातही पूर्वज एकाच वेळी आकाशातून धप्कन खाली पडतात, हे ग्राफिक्सच्या साहाय्यानेच शक्य झाले. हे करताना खूप गंमत झाली, पण त्यासाठी मेहनतही खूप करावी लागली.
आता चित्रपटात शब्दांवर विनोद खेळवला जातो – विजय चव्हाण
पूर्वीच्या वेळी शब्दांवर विनोद करण्याची पद्धत नव्हती. चित्रपटातील विनोद हा अंगविक्षेपावर आधारित होता. पण, आता शब्दांवर विनोद केला जातो. म्हणजे एखादी बाई जात्यावर दळत असेल, तर ‘तुझं काय जातं’ वगैरे विनोद करता येतात. ही स्टाइल लोकांना आवडते आहे. आम्ही मग आमच्या पद्धतीत बदल करून घेतला. दहा वर्षांनंतर सगळं बदलत जातं. त्यामुळे तुम्हाला काळानुसार स्वत:मध्ये बदल करावेच लागतात. आताच्या मुलांनी आमचे विनोद, ते करण्याची पद्धत पाहिली, तर त्यांना खूप रटाळ वाटू शकतं. तसंच आमच्या पिढीला हे सगळं खूप वेगवान वाटतं.
‘खो-खो’मध्ये भरतच्या वाडय़ाचा मी केअर टेकर आहे. घाटपांडे नावाच्या या इसमाची भूमिका मी करतोय. मला सात मुली आहेत. बायको आधीच गेल्याने या सातही जणींची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यापैकी सहा जणींची लग्न लावून दिली आहेत. आता सातव्या मुलीचं लग्न लावायचं आहे. नेमका भरत आल्यानंतर कळतं की, भरतचं लग्न झालं नाहीए. मग मी माझी मुलगी त्याच्या गळ्यात बांधायच्या मागे लागतो. पण केदारने मला खरंच खूप चांगली संधी दिली आहे. एकाच वेळी विनोदी आणि गंभीर छटा असलेले प्रसंग माझ्या वाटय़ाला आले आहेत.
केविलवाणा श्रीरंग माझाच! – भरत जाधव
नाटक हे नाटक असतं आणि चित्रपट हा चित्रपट असतो. केदारच्या डोक्यात नाटकाची कल्पना घोळत होती, त्या वेळीही त्याच्यासमोर मीच होतो. गेली चार-पाच वर्षे केदारच्या डोक्यात या नाटकावर चित्रपट काढायचा विचार होता. त्याने चार-पाच गोष्टी चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्या. मलाही त्या आवडल्या. तो जीव लावून काम करणार, हे माहीत होतं. त्याला चित्रपटासाठी श्रीरंग देशमुख केविलवाणाच हवा होता. तो शिक्षक आहे, त्याचा कोणीही अपमान करतो. त्यामुळे त्या भूमिकेची कीव आली पाहिजे. हे कॅरेक्टर मला भावलं. समजा मी एखादं नाटक केलं असेन आणि त्यावर चित्रपट येत असेल, तर मी मलाच चित्रपटात घ्या, असा हट्ट नाही करणार. पण मी काही वर्षांपूर्वी केलेलं नाटक नव्याने येत असेल आणि मला विचारलं नाही, तर मी नक्कीच ‘या नाटकात मी का नाही’, अशी विचारणा करेन.
आताची उडी खूप मोठी -सिद्धार्थ जाधव
‘लोच्या..’ मिळालं होतं, त्या वेळी कारकिर्दीची सुरुवात होती. नवीन कलाकार म्हणून एखादं व्यावसायिक नाटक मिळणं, हीच खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळे मला त्या वेळी स्वत:ला सिद्ध करायचं होतं. त्यासाठी त्या वेळी खूप मेहनत घेतली होती. आता माझ्यावरची जबाबदारी जास्त होती. कारण आता नावारूपाला आल्यावरही केदारने माझ्यावर विश्वास टाकून माझीच निवड त्या आदिमानवाच्या भूमिकेसाठी केली. पण हे काम करताना निश्चितच मजा आली. हे पात्र खूप लोभसवाणं आहे. त्याला काहीच कळत नाही. त्यामुळे त्याला करण्यासारखं खूप आहे. नाटकापेक्षा इथे हे पात्र खूप चांगलं उभं राहिलं आहे. आताची उडी खूप मोठी आहे, त्या रंगमंचावरच्या उडीपेक्षा. आता दुखापतही खूप झाली हे काम करताना. मांडी फाटली, पाय फ्रॅक्चर झाला, नख तुटलं, गुढग्याला लागलंय या सगळ्याच दुखापतींना तोंड द्यावं लागलं. पण त्याचा खूप वेगळा आनंद आहे.
मराठी निर्मात्यांची बैठक होण्याची गरज
चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्याआधी सर्व मराठी निर्मात्यांनी एकमेकांबरोबर ताळमेळ ठेवायला हवा. त्यामुळे एकाच दिवशी पाच चित्रपट प्रदर्शित होण्यासारखे अपघात टाळता येतील. त्याचप्रमाणे आपण प्रदर्शनासाठी एखादी तारीख ठरवली की, मग त्या तारखेला किंवा फारतर त्याच्या पुढेमागे आपला चित्रपट प्रदर्शित करण्याची जबाबदारी निर्मात्यांनी उचलली पाहिजे. कारण चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कलाकाराने तारखा ठेवलेल्या असतात. पण आम्हीच त्यांना दोन आठवडे आधी कळवतो की, आपण एक पुढच्या महिन्यात प्रदर्शित करणार आहोत. पण त्या कलाकाराने पुढे आपल्या तारखा वेगळ्या कामासाठी दिल्या असतील, हा विचार आमच्यापैकी कोणीच करत नाही.
तिथे संजय इथे भरत हा लोच्या कसला?
‘लोच्या..’च्या वेळी केदारच्या डोळ्यासमोर भरतचेच नाव होते. मात्र २००२मध्ये ‘सही रे सही’ आल्यानंतर भरत खूपच व्यग्र होता. ‘सही.’ नंतर निर्मात्यांना लवकरच दुसरे नाटक करायचे होते. मात्र भरतच्या तारखा मिळत नव्हत्या. मग संजय नार्वेकरचे नाव विचारात आले. त्याने संस्थेबरोबर काम केले होते, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संजयमध्ये एक कमालीची एनर्जी आहे. प्रेक्षकांना तीन तास खुर्चीत खिळवून ठेवण्यात संजय सरस आहे. २००४मध्ये केदारने ‘अगंबाई अरेच्चा’ केला. त्या वेळी त्या भूमिकेची गरज होती की, संजयने ती भूमिका करावी. त्यामुळे तिथे संजय होता. आता परत ‘लोच्या.’वर चित्रपट करण्याचा विचार केदारने केला, त्या वेळी त्याच्या डोळ्यांसमोर भरत आला.