भारतीय आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान असलेल्या कोल्हापूरच्या चित्रनगरीला पुन्हा एकदा बाळसे धरले असून गेल्या काही वर्षांपासून सुन्या असलेल्या या चित्रनगरीत सध्या ‘अंगारकी’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे. कोल्हापूरच्या चित्रनगरीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुण्याचे अविनाश मोहिते हे निर्माते पुढे सरसावले असून त्यांनी आपल्या या चित्रपटाचे चित्रीकरण मोठय़ा दिमाखात या चित्रनगरीत करण्याचे ठरवले आहे.
या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे ‘अंगारकी’च्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अवतार गिल आणि अभिनेत्री गार्गी पटेल हे दोघेही पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करणार आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका केलेल्या गिल यांच्यासमोर मराठीतील आघाडीचा कलाकार मकरंद अनासपुरे मुख्य भूमिकेत असेल. तर मकरंदसह तेजस्विनी पंडितही चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत दुधगावकर करणार असून लेखनाची धुरा संजय पवार यांनी सांभाळली आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाली असताना ही चित्रपटसृष्टी जेथे फुलली त्या कोल्हापूरच्या चित्रनगरीला उतरती कळा लागली होती. गेल्या अनेक वर्षांत एकाही चित्रपटाचे किंवा मालिकेचे चित्रीकरण कोल्हापूरच्या या चित्रनगरीत झाले नव्हते. त्यामुळे आम्ही या चित्रनगरीला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने येथे चित्रीकरण करत आहोत, असे अविनाश मोहिते यांनी सांगितले. ‘अंगारकी’च्या चित्रीकरणाला २० मेपासून सुरुवात होत आहे.

Story img Loader