महाराष्ट्र शासनाचा कोल्हापुरात शुक्रवार, १२ एप्रिलपासून मराठी व हिंदी चित्रपट महोत्सव सुरू होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार असून सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवताळे हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या वेळी कामगारमंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक राज्यमंत्री श्रीमती फौजीया खान, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे.    
हा महोत्सव जिल्हा प्रशासन, कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्या सहयोगाने आयोजित केला असून ‘इन्व्हेस्टमेंट’ या चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. एकूण २० मराठी व १० हिंदी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये संत तुकाराम, कुंकू, ब्रह्मचारी, नेताजी पालकर, रामशास्त्री, जय मल्हार, गुळाचा गणपती, सांगते ऐका, मल्हारी मरतड, फकिरा, मुंबईचा जावई, तसेच मदर इंडिया, दो बिघा जमीन, आवारा, किस्मत, गाइड या चित्रपटांचा समावेश आहे. हा महोत्सव विनामूल्य असून ११ एप्रिल अखेर सायंकाळी ४ ते ८ या वेळेत कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी येथे प्रवेशिका उपलब्ध होतील, असे जिल्हा प्रशासन व महोत्सव संयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Story img Loader