मराठी समृद्ध भाषा असून ती जोपासण्याची जबाबदारी सर्वाची आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्याने मराठी अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ‘नवोदिता’च्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित कलासाधक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय आईंचवार होते, तर नवोदिताचे अध्यक्ष शरद गुप्ता, वीणा पाठक, चंदू पाठक व्यासपीठावर उपस्थित होते.
येथील कलावंतांची प्रगती बघून अत्यानंद होतो. नवोदितासारख्या संस्थेच्या माध्यमातून आज अनेक कलावंतांसाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या संस्थेने उत्तम कलाकार घडवले. एकेकाळी चंद्रपूर कुठे आहे, हे मुंबई-पुण्यातल्या लोकांना सांगावे लागत असे, मात्र जेव्हा येथील कलावंत राज्य नाटय़ स्पध्रेत यश प्राप्त करतात व चंदू पाठकांसारखा कलावंत आपल्या कलेने चंद्रपूरकरांचे नाव उंचावतो तेव्हा जिल्ह्य़ाची किर्ती आपोपच सर्वत्र पोहोचते, असेही ते म्हणाले. नवोदिताच्या वतीने कलाक्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या कलावंताला ४ वर्षांंपासून कलासाधक पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा कलासाधक पुरस्कार ३० वर्षांहूनही अधिक कालावधीपासून चित्रकलेची साधना करणाऱ्या चंदू पाठक यांना प्रदान करण्यात आला. पाठक हे तीस वर्षांपासून या शहरात वास्तव्याला आहे. अगदी सुरुवातीपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांचे चित्र साकारून ते त्यांना भेट स्वरूपात देण्याचा छंद पाठक यांनी जोपासला आहे. एका सामान्य व्यक्तीला महान लोकांपर्यत पोहोचणे अवघड असले तरी त्यांनी त्यांच्या जिद्दीने हा छंद सतत सुरू ठेवला, तसेच त्यांचे अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेम जगजाहीर आहे. आपले काम सांभाळून आगळावेगळा छंद जोपारणाऱ्या या कलावंताची दखल घेत नवोदिताने त्यांना पुरस्कृत केले व त्यांचा सपत्नी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पाठक यांनी आपला कलाप्रवास श्रोत्यांसमोर उलगडून दाखवला. ज्यांचे ज्यांचे सहकार्य आपल्या या प्रवासात लाभले त्यांचे ऋणही त्यांनी यावेळी व्यक्त केले. काही कटू अनुभवही आले, मात्र या अनुभवांनी अधिकाधिक समृध्द केले, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात राज्य बालनाटय़ स्पध्रेत प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या चमूचा सत्कार करण्यात आला. यात उत्कृष्ठ अभिनयासाठी पारितोषिक मिळवणाऱ्या बकुळ धवने, अथर्व माधमशेट्टीवार, दिग्दर्शक नूतन धवने, प्रकाश योजनाकार हेमंत गुहे, हिमांशु जोशी, निनाद जगम, जागृती निखारे, स्वदेश ठाकरे, वैष्णवी मोहुर्ले, ऋतुजा देशमुख, रजत देशमुख, संकेत कोलप्याकवार, संगीत दिग्दर्शक राहुल मेडपल्लीवार, रंगमंच व्यवस्था कुणाल ढोरे, रंगभूषा-वेशभूषा शीतल बैस, परिमल बोबडे आदीचा सत्कार करण्यात आला. एका प्रेमभंगाचा अभंग या युवक गटातील नाटकातील अभिनयासाठी प्रशांत मडप्पुवार, कल्याणी जोशी, दिग्दर्शक प्रशांत कक्कड, नेपथ्यकार विष्णू पगारे, दिगबंर इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अजय धवने यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा