आज राज्य मराठी भाषा दिन
कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा दरवर्षी राज्य मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा आणि साहित्य यांचा संस्कार मराठी भाषकांच्या मनी मानसी रुजविणे हा त्या मागचा उद्देश आहे. गेल्या काही वर्षांत वैचारिक, ललित, ऐतिहासिक, शैक्षणिक, धार्मिक आणि करियरच्या दृष्टीने अनेक नवीन पुस्तकांची निर्मिती झाली असून वाचकांसमोर वाचनासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
या संदर्भात शहरातील काही प्रकाशन क्षेत्रातील लोकांशी संवाद साधण्यात आला. साहित्य प्रसार केंद्राचे मकरंद कुळकर्णी म्हणाले, व्यवस्थापन कार्यपद्धती, व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअर संदर्भातील पुस्तकांची विक्री मोठय़ा प्रमाणात वाढली असून त्या तुलनेत कथा कांदबरीची विक्री मात्र थंडावली आहे. जुन्या ऐतिहासिक कांदबऱ्यांना मागणी आहे. अच्युत गोडबोले यांच्या मुसाफीर आणि इतर पुस्तकांना विद्यार्थ्यांकडून चांगली मागणी आहे. ई बुक्समुळे पुस्तकांची मागणी कमी झाली नाही. विद्यार्थ्यांंमध्ये पुस्तकांची ओढ निर्माण होऊ लागली आहे. विशेषत: निसर्गावरची पुस्तके जास्त वाचली जात असून या पुस्तकांची मागणी वाढली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक आणि पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या पक्षीकोषाची नवीन आवृत्ती बाजारात आली असून मार्चच्या पहिल्या आठवडय़ात वाचकांना उपलब्ध होईल. महागाई सर्वच क्षेत्रात वाढली आहे. पुस्तकांच्या किमती फार वाढल्या नाहीत. त्यामुळे त्याचा विक्रीवर विशेष परिणाम नाही. लोकांना वाचन करायला वेळ मिळत नाही. मधल्या काळात टीव्हीमुळे विद्याथ्यार्ंचा वाचनाकडे कल कमी होता. मात्र, तो वाढला आहे. मराठी अनुवादित पुस्तकांना सध्या चांगली मागणी आहे. अच्युत गोडबोले यांची मनात, मुसाफीर, किमयागार इत्यादी पुस्तके वाचली जातात. या शिवाय चेतन भगत, मारुती चितमपल्ली, सुधा मूर्ती, प्रवीण दवणे, सच्चिदानंद शेवडे यांच्या पुस्तकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, असेही असेही कुळकर्णी म्हणाले.
राजहंस प्रकाशनचे नरेश सब्जीवाले म्हणाले, वाचकांच्या आवडीमध्ये फारसा फरक नाही. चरित्रात्मक, कथा कांदबऱ्या आणि करियरच्या पुस्तकांची मागणी गेल्या काही दिवसात वाढली आहे. वाचक कमी झाले नसून वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकांची विक्री होत आहे. विज्ञानविषयक पुस्तकांची मागणी वाढली आहे. चरित्रात्मक पुस्तकाकडे लोकांचा चांगला कल आहे. या शिवाय अनुवादित पुस्तके अनेक लोक मागत असतात. कोशवाङ्मयाची मागणी वाढली आहे. ललित साहित्याचा वाचक भरपूर आहे. त्यामुळे त्या साहित्याची विक्री चांगली होत आहे. महागाईमुळे किमती वाढल्या असल्या तरी त्याचा विक्रीवर फारसा परिणाम नाही. कागदासह इतरही खर्च वाढले असले तरी पुस्तकांच्या किमती जास्त वाढविता येत नाहीत, असेही सब्जीवाले यांनी सांगितले.
लाखे प्रकाशनचे चंद्रकात लाखे म्हणाले, पुस्तकांची मागणी वाढण्यापेक्षा वाचक वर्ग वाढला आहे. अनेक लोक वाचनालयात जाऊन वाचन करीत आहेत. विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके मागत आहेत. पुस्तकांची मागणी कमी झाली नसून ती वाढली आहे. चरित्रात्मक आणि एतिहासिक पुस्तकाला सध्या चांगली मागणी आहे.
ज्ञानेश प्रकाशनचे भा. ना. काळे म्हणाले, वैचारिक पुस्तकांना चांगली मागणी आहे. त्यानंतर चरित्र आणि धार्मिक पुस्तकांकडे लोकांचा कल आहे. दरवर्षी साधारणत: १५ ते २० नवीन पुस्तके प्रकाशित केली असून काही पुस्तकांच्या नवीन आवृत्ती काढल्या जातात. ऐतिसाहिक आणि विज्ञान विषयक पुस्तकांची मागणी होऊ लागली आहे. पर्यावरणाकडे सुद्धा लोकांचा कल आहे. या विषयावरील पुस्तके प्रकाशित होत असून ती सुद्धा मागितली जातात. बालवाङ्मयाची विक्री चांगली होते. मात्र, त्यात हवा तसा पैसा मिळत नाही. बालवाङ्मयाच्या पुस्तकांच्या किमती जास्त ठेवता येत नाहीत, असेही काळे म्हणाले.