अकरावीचा मराठी भाषा विषयाचा सुधारित अभ्यासक्रम व पाठय़पुस्तक ‘ज्ञानरचनावादा’शी विसंगत असून राष्ट्रीय तसेच राज्य शैक्षणिक धोरणातील भाषा शिक्षणाच्या उद्दिष्टय़ांपासून फारकत घेणारा असल्याची टीका कनिष्ठ महाविद्यालयातील मराठीच्या शिक्षकांकडून केली जात आहे.
मराठीच्या नव्या पाठय़पुस्तकात अनेक त्रुटी असून अन्य इयत्तांची पुस्तके तसेच समकक्ष व पर्यायी असणाऱ्या अन्य भाषांच्या पुस्तकांशी तुलना करता हे पुस्तक मनमानी पद्धतीने तयार करण्यात आल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. या पाठय़पुस्तक निर्मितीशी संबंधित असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या तज्ज्ञांसमवेत ‘मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय अभ्यास मंडळ’ची एक बैठक अलीकडे माटुंग्याच्या पोतदार महाविद्यालयात पार पडली. त्यावेळी शिक्षकांच्या शंकांचे निरसन करताना अभ्यास मंडळाच्या सदस्यांना प्रक्षुब्ध भावनांचा सामना यावेळी करावा लागला.
प्रा. स्नेहा जोशी यांनी नवा अभ्यासक्रम ज्ञानरचनावादावर आधारित असल्याचा दावा केला तर प्रा. उदय रोटे यांनी प्रस्तुत अभ्यासक्रम ज्ञानरचनावादाशी विसंगत आणि राष्ट्रीय उद्दिष्टांशी फारकत घेणार असल्याचा आरोप केला. निमंत्रक-समन्वयकांनी पाठय़पुस्तकातील त्रुटींची जबाबदारी घेऊन तातडीने नवीन अभ्यासक्रम तयार करावी, अशी सूचना या बैठकीचे अध्यक्ष प्रा. विजय तापस यांनी केली.
भाषिक उपयोजनाला अतिरिक्त महत्त्व देऊन अभ्यासक्रमाचा समतोल बिघडविला आहे, असे मत अनेक शिक्षकांनी मांडले. ‘पत्रलेखन, वृत्तांतलेखन, जाहिरात, भाषांतर, सारांश, आकलन या विषयी निर्देशनात्मक स्वरूपाची व ढोबळ माहिती देणारे पाठ देऊन पाठय़पुस्तक नीरस व अनाकर्षक केले गेले आहे,’ असे प्रतिपादन प्रा. सुजाता औटी यांनी केले. सूत्रसंचालन, सादरीकरण, संगणकीय भाषा इत्यादी प्रात्यक्षिकांवर आधारित विषय घटकांचे मूल्यपमापन लेखी परीक्षेतून करणे अन्यायकारक असल्याचे मत प्रा. किशोर देसाई यांनी मांडले. विद्यार्थ्यांच्या भाषाशिक्षणाच्या व भाषाहिताच्या विरोधी बाबी तातडीने बदलण्यात याव्या, असा ठराव प्रा. उत्कर्षां मल्या यांनी मांडला असता त्याला सर्वानी अनुमोदन दिले. प्रा. मुकुंद आंधळकर यांनी मराठीच्या शिक्षणाविषयीची सरकारची उदासीनता, गोपनीयतेच्या नावाखाली आलेली अपारदर्शकता व धोरणात्मक अविवेक असल्याचे मत व्यक्त केले.
अकरावीची नियमित आधुनिक भाषा विभागातील गुजराती आणि हिंदी आदी विषयांची पुस्तके (युवकभारती) राज्य शैक्षणिक आराखडय़ानुसार आशय विषय आणि मूल्यसंस्कार यांना केंद्रस्थानी ठेवून तयार केली आहेत. व्यावहारिक हिंदी हा स्वतंत्र पर्यायी अभ्यासविषय व पाठय़पुस्तक ऐच्छिक स्वरूपात ठेवण्यात आला आहे. मराठीला मात्र उलटा न्याय लावत उपयोजित मराठीचे पुस्तक म्हणून नियमितपणे नेमले आहे. मराठी साहित्य हे ऐच्छिक तत्त्वावर पर्यायी पुस्तक निर्माण केले आहे, याकडे प्रा. राजेंद्र शिंदे यांनी लक्ष वेधले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा