भाषा ही आपली अस्मिता व ओळख आहे. संस्कृतप्रमाणे प्राचीन असलेल्या या भाषेला दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. पुणे जिल्ह्य़ात नाणेघाट (तालुका जुन्नर) येथील शिलालेख २ हजार २२० वर्षांपूर्वीचा असून मराठीतला तो पहिला शिलालेख आहे. याशिवाय अभिजाततेसाठीचे चारही निकष मराठी भाषा पूर्ण करीत असल्यामुळे मराठीला अभिजात दर्जा मिळणारच, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासन विभागाचे प्रमुख प्रा. हरी नरके यांनी केले.
राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, माहिती-जनसंपर्क महासंचालनालय व ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने बी. रघुनाथ सभागृह येथे ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात नरके बोलत होते. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री, कवी इंद्रजित भालेराव आदी उपस्थित होते. ‘अभिजात मराठी’ या विषयावर प्रा. नरके म्हणाले की, देशातील एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालय महाराष्ट्रात आहेत. ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र हे मराठीला समृद्ध करणारे ग्रंथ आहेत. गाथा सप्तसती हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे. राज्यात दरवर्षी सुमारे दोन-अडीच हजार नवीन ग्रंथ प्रकाशित होतात. संस्कृत, कन्नड, तेलगू, तमिळप्रमाणेच मराठी भाषेचे योगदान मोठे आहे. भाषेची प्राचीनता, मौलिकता आणि संलग्नता, परंपरेचे स्वयंभूपण, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले नाते असे सर्व निकष पूर्ण करीत असल्याने मराठीला अभिजाततेचा दर्जा निश्चित मिळेल. असा दर्जा मिळाल्यानंतर भाषेच्या उत्कर्षांसाठी दरवर्षी ५०० कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातूनच मराठीतल्या उत्तम पुस्तकांचा अनुवाद, ग्रंथनिर्मिती यासारख्या चळवळींना बळ मिळणार आहे.
देशातील २ हजार शिलालेखांपैकी महाराष्ट्रात ८०० शिलालेख आहेत. यातील ६०० शिलालेख मराठवाडय़ात असून अजिंठा, वेरुळ आणि इतर लेण्यांमध्ये असलेले शिलालेख अभिजात दर्जा मिळविण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. गोदाकाठेवर मराठी भाषा समृद्ध झाली. मराठीत एकूण ५२ बोलीभाषा आहेत. यातील साहित्य, म्हणी जतन करणे गरजेचे आहे.
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांएवढीच वाचनसुद्धा गरज वाटली पाहिजे. मराठीत जागतिक तोडीचे जवळपास १ हजार ग्रंथ आहेत. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यावर दरवर्षी केंद्राकडून ५०० कोटींचा निधी प्राप्त होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा