देशात मूलभूत गरजा शोधण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता असून विज्ञान साहित्याची निर्मिती जेवढी विपूल होईल तेवढे मराठी साहित्य समृद्ध होईल. विज्ञान साहित्याने मराठी साहित्याचा दर्जाही वाढेल, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.
विद्यापीठ अनुदान आयोग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ  व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय, राणीसावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विषयातर्फे ‘समकालीन मराठी साहित्य प्रवाह निर्मिती प्रेरणा व स्वरूप : दलित, आदिवासी, ग्रामीण, स्त्रीवादी’ या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी श्रमजीवी समाजकल्याण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. रंगनाथ राठोड हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. दळणर यांनी कुलगुरू डॉ. विद्यासागर यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी ‘समकालीन मराठी साहित्यप्रवाह’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
आजच्या साहित्यामध्ये नावीन्य दिसून येत नाही, अशी खंत व्यक्त करून डॉ. विद्यासागर म्हणाले, देशातील साहित्यामध्ये विज्ञानाचा वापर झाला पाहिजे. त्यामुळे देशाची प्रगती होईल. सध्या विज्ञानाचे युग आहे. विज्ञान साहित्यामध्ये कादंबरीचे लिखाण केले जावे,  यासाठी लेखकाने समोर आले पाहिजे.
यावेळी डॉ. लुलेकर म्हणाले, परिवर्तन ही सातत्याने चालणारी बाब आहे. साठोत्तरी साहित्य प्रवाहांचा विचार केला तर अनेक समूहांमध्ये जाणीव जागृती झाली. त्याची कारणे आपल्या पूर्वीच्या साधारणत: शतकभराच्या इतिहासात दडली आहे. ब्रिटिशांमुळे देशातील समान न्याय, समान शिक्षण आदींचा प्रसार झाला. महाराष्ट्रातल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीने साहित्यालाही समृद्ध केले.
प्राचार्य डॉ. दळणर म्हणाले, साहित्यामधूनच खरा माणूस घडत असतो. साहित्य जीवनाचा आरसा असतो. मराठी साहित्याला आज वास्तव जीवनानुभवाचा स्पर्श झालेला आहे. मराठी साहित्यामध्ये आज अनेक प्रवाह निर्माण झाले आहेत. त्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले. यावेळी डॉ. वासुदेव मुलाटे यांचेही भाषण झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा