घरातील कोणतीही जागा न अडवता लावता येणाऱ्या झाडांना हँगिंग म्हणता येईल. सुंदर, आकर्षक पानांची आणि फुलांची झाडं लावून हँगिंग बास्केट्स तयार केल्या की, घराच्या सजावटीत भर पडते. फुलं येणारी झाडं बास्केटस्मधून लावलीत की आगळावेगळा, जिवंतपणा घराला येईल. निरनिराळय़ा ऋतुत वेगवेगळी झाडं फुलतात. फुलं येणाऱ्या काही झाडांची पानंही आकर्षक असतात. फुलं येणाऱ्या बास्केटस्ला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. अशी सोय जर आपल्या बागेत असेल तर हँगिंग बास्केटस् फुलांच्याच जरूर कराव्यात. आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये बागेला कमी जागा मिळते. अशा वेळी हँगिंग बास्केटमध्ये झाडं लावल्यास त्या फ्लॅटच्या इमारतीलाही शोभा आणतील. लोंबकळणाऱ्या टोपलीत लावण्यासाठी पुढील फुलांची झाडं योग्य असतात. पिटोनिया, सालव्हिया, बिगोनिया, डँथस, शेवंती, लँटिना, जरबेरा, पेंटास, युफोरबिया, फ्लोरिबंडा गुलाब, वेली गुलाब मिनीएचर गुलाब हँगिंग्जची शोभा वाढवतात. सुंदर आकर्षक फूल पाहीलं की, दिवसभराचा ताण, थकवा दूर व्हायला मदत होते. एखाद्या गल्लीतून लोंबकळणारी फुलांची टोपली पाहिली की, मन आनंदित झाल्याशिवाय राहत नाही. मनाला आनंद देण्याची शक्ती फुलांमध्ये खूप प्रमाणात असते. हिरवी रंगीबेरंगी पानांची झाडंही या बास्केटस्मधून छान दिसतात. अॅस्परगस, शतावरी, फर्न, ट्रॅडेन्स्केशिया, फायकस, क्लेरोडेन्ड्रम, क्लोरोफायटम, काही सॅक्युलंटस, काही सिडम व्हेरिगेटेस रोप, आय. व्ही. क्रीपर्स, रिबन ग्रास अॅडियन्टम, स्पायडर, पिलिया, हिडेश आणि कोलियसचे सर्व रंगाचे प्रकार हँगिंगमध्ये शोभून दिसतात.
हँगिंग लावण्यासाठी एक बादली बारीक माती, एक बादली बारीक केलेलं शेणखत आणि मूठभर केमडॉल पावडर, असं मिश्रण तयार करावं. आपणास आवडेल त्या आकाराची टोपली, कुंडी किंवा भांडं घ्यावं. त्यात सर्व बाजूंनी मॉस भरून घ्यावं. मॉस भरताना ते टोपलीच्या कडांच्या वर एक इंच उंच येईल, अशा रीतीनं भरावं. त्यात माती भरल्यानंतर ती दाबावी म्हणजे मॉस, शेवाळ दबले जाईल. त्यानंतर त्यात कोणत्याही झाडाचा वाळलेला पाला घालावा. टोपली जर जाळीची असेल तर सर्व बाजूंनी झाडांची वाढही चांगली होते. तयार केलेली माती, शेणखतचं मिश्रण त्यावर घालावं. तयार रोपं असतील तर दोन इंच खोल लावावीत. हँगिंगला भरपूर पाणी टाकावं. त्यामुळे झाडांच्या पानांवर बसलेली धूळ धुतली जाऊन पानं टवटवीत दिसतील. गवत उगवल्यास ते काढून टाकावं. अनेकदा झाडांवर कीड, रोग दिसल्यास एक बादली पाण्यात पाच टी-स्पून रोगोर व पाच टिस्पून बावीस्टिन पावडर टाकून हलकासा फवारा झाडांवर मारावा. महिन्यातून एकदा असा फवारा मारल्यास रोग पडणारच नाही. हँगिंग साध्या बांबूपासून आडवे, असंही करता येईल. ते खिडक्यांवर लावायला छान दिसतील. बेताच्या, बांबूच्या टोपल्यातही हँगिंग म्हणून वापरता येतील. खराब झालेल्या स्कूटरचा टायर, पावडरचे रिकामे डबे, तारांचे वेटोळे, मातीची उथळ हलकी कुंडीही हँगिंग म्हणून वापरता येईल. आपण जेवढी कल्पकता वापरू तेवढय़ा प्रमाणात विविध रूपाने हँगिंग लावून घराची व इमारतीचीही शोभा वाढवता येते. हँगिंग सुंदर दिसावं म्हणून त्याला रंग मारावा. त्यांतील झाडांचा रंग, दोरीचा रंग, हँगिंगचा, रंग याची रंगसंगती जर साधली तर हँगिंग दिसायलाही सुंदर दिसेल. झाडाचा रंग जर हिरवा असेल तर दोरीला पांढरा किंवा पिवळा रंग द्यावा आणि कुंडीला लाल किंवा टेराकोटा कलर द्यावा. कुंडय़ा ठेवायलाही ज्यांच्याकडे जागा नसेल त्यांच्याकडे अशा लोंबकळणाऱ्या हँगिंगनी घराची शोभा त्यांना नक्कीच वाढवता येईल. आपण कलात्मकतेनं तयार केलेल्या हँगिंगमधील रंगीबेरंगी पानांची झाडं, विविध रंगाच्या फुलांनी भरलेली टोपली पाहून मनाला शांती आणि खूप खूप समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही.
गार्डनिंग : हँगिंग बास्केट्स
घरातील कोणतीही जागा न अडवता लावता येणाऱ्या झाडांना हँगिंग म्हणता येईल. सुंदर, आकर्षक पानांची आणि फुलांची झाडं लावून हँगिंग बास्केट्स तयार केल्या की, घराच्या सजावटीत भर पडते. फुलं येणारी झाडं बास्केटस्मधून लावलीत की आगळावेगळा, जिवंतपणा घराला येईल. निरनिराळय़ा ऋतुत वेगवेगळी झाडं फुलतात. फुलं येणाऱ्या काही झाडांची पानंही आकर्षक असतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-09-2012 at 10:59 IST
मराठीतील सर्व विदर्भरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi marathi news gardaning hanging basket sima ramesh mamidwar