आठवा तो निसर्गयोग, शांतचित्ताने कुठंही बसून आत्ममग्न होऊन विचार केला तर उत्तर अगदी सहजपणे सापडेल. वन्यप्राणी माणसाच्या प्रदेशात प्रवेश करत आहेत की माणूस त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर जबरदस्तीनं आपला हक्क दाखवायचा प्रयत्न करत आहे?. आम्ही धरणं बांधून जंगलाला विभाजित केलं, सीमारेषा आखून राज्य आणि देश विभाजित केले, पण जंगलातल्या प्राण्यांना या सीमारेषेचं काय सोयरसुतक?
साप डिवचला गेल्यावर त्याने स्वसंरक्षणासाठी फणा काढणं, चावणं हा त्याचा ‘बेसिक इन्सिक्ट’ अन् कुठलाही साप दिसला की, त्याला (तो विषारी आहे की बिनविषारी, याचा जरादेखील विचार करण्याची तसदी न घेता) ठेचून काढणं हा मनुष्यप्राण्याचा ‘बेसिक इन्सिक्ट’. जखमी, वृद्ध, शिकार न करू शकणाऱ्या किंवा माणसाचे अतिक्रमण सहन न झालेल्या वाघाने नाईलाज म्हणून माणसावर हल्ला करणं हा वाघाचा ‘बेसिक इन्सिक्ट’ तर गावात वाघ दिसला की, (किंबहुना त्याला शोधून काढून) त्याला काठय़ांनी बदडणं, गोळ्या झाडणं किंवा त्याची हाडं, मिशा, नखं अन् कातडी विकून रग्गड पसा कमवणं हा माणसाचा ‘बेसिक इन्सिक्ट’. जंगलातलंच कशाला, आपल्या आसपास घडणाऱ्या एखाद्या घटनेकडे बघितलं तरी जाणवतं, झाडावर उगवलेलं फूल ही जणू खाजगी मालमत्ता असल्याच्या अविर्भावात बरीच श्रद्धाळू मंडळी देवाला फुलांच्या माळांनी सजवून त्याची ‘शोभा’ करतात, पण त्या झाडाला काही दिवस पाणी देऊन त्याची सेवा करण्यास तथाकथित भक्तांना वेळ नसतो. कुठली भक्ती आणि कसली श्रद्धा? झाडाला नागवं करून त्याच्या अपत्यांना खोडून आम्ही कुठलं पुण्य पदरात पाडून घेत असतो? मला प्रश्न पडतो की, अशा वेळी माणुसकी म्हणायचं कशाला? आणि त्या पूजेच्या वेळीही मोबदल्यात आपलं ‘त्याच्या’कडे काहीतरी मागणं असतं ते वेगळंच. या देवाणघेवाणीच्या बाजारू वृत्तीला दूर ठेवून कधी शांतचित्ताने निसर्गदेवतेचं स्मरण करून विचारमंथन केलं तर जमिनीवर खाली पडलेल्या फुलांचं निर्माल्यदेखील देव्हाऱ्यातल्या मूर्तीसमोरच्या फुलाच्या निर्माल्यापेक्षा अधिक पवित्र वाटायला लागतं. हा कुठला धर्म नाही तर मी तुम्हाला ‘निसर्गयोग’ सांगतोय. कधी शांतचित्ताने देवळाच्या पायथ्याशी, नदीच्या काठी किंवा झाडाखाली बसून आत्ममग्न होऊन विचार केला तर उत्तर अगदी सहजपणे सापडेल. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, प्रेमयोग या विषयांएवढाच निसर्गयोगदेखील सहजसुंदर आहे.
आज सगळीकडे वन्यप्राण्यांबाबत बोंबाबोंब सुरू असल्याचं दिसतं. बिबटय़ाने मानवी वस्तीत येऊन हल्ला केला, अस्वलाने मोहाची फुलं उचलायला गेलेल्या स्त्रीवर हल्ला केला. मग शासनदरबारी कुठल्याशा बठका होतात, पीडित कुटुंबाला काहीतरी मोबदला दिला जातो, कागदोपत्री कारवाई पूर्ण झाली की, परिस्थिती ‘जैसे थे’ होते आणि काही दिवस शांततेत गेल्यावर पुन्हा कुठंतरी माणसावर दुसरा हल्ला होतो यावेळी मात्र ‘त्या’ वन्यप्राण्याला जिवंत ठेवायचं नाही, असा पण करून लोकं त्याच्यावर आणि परिणामी माणुसकीवर हल्ला करतात. मग त्या वाघ, अस्वल किंवा बिबटय़ाला मारल्यावर त्याच्यासोबत फोटो काढून एखाद्या रणांगण गाजवलेल्या शूराच्या अविर्भावात कथा रंगवल्या जातात, वर्तमानपत्रात येणाऱ्या त्या बातम्यांनी निसर्गप्रेमींनी हळहळ व्यक्त करायची आणि वर्तमानपत्राची घडी घालून मूग गिळून गप्प बसायचं. किती दिवस जगायचं या हतबलतेपायी? काहीच का उत्तर नाही या प्रश्नावर?
आठवा तो निसर्गयोग, शांतचित्ताने कुठंही बसून आत्ममग्न होऊन विचार केला तर उत्तर अगदी सहजपणे सापडेल. वन्यप्राणी माणसाच्या प्रदेशात प्रवेश करत आहेत की माणूस त्यांच्या नसíगक अधिवासावर जबरदस्तीनं आपला हक्क दाखवायचा प्रयत्न करत आहे?. आम्ही धरणं बांधून जंगलाला विभाजित केलं, सीमारेषा आखून राज्य आणि देश विभाजित केले, पण जंगलातल्या प्राण्यांना या सीमारेषेचं काय सोयरसुतक? एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात हवा ज्या सहजतेनं वाहून जाते त्याच सहजतेनं हे पशूपक्षी स्थलांतर करून जातात. त्यांना माणसाच्या रेषेचं बंधन ठाऊक नाही. मग हाच प्राणी माणसानं त्याच्याकडून जबरदस्तीनं हिसकावून घेतलेल्या जंगलात परत आला तर त्यात त्या प्राण्याचा काय दोष?
प्रश्न अगदी सोपा आहे आणि उत्तरदेखील; परंतु त्याचं अमलीकरण कठीण आहे. ते सहजसाध्य तेव्हाच होईल जेव्हा आपल्या मनातला निसर्गाबद्दलचा आदरभाव जागा असेल. वन्यप्राण्यांना मारून किंवा त्यांचा अधिवास नष्ट करून हा प्रश्न संपणार नाही, तर आणखीनच बिकट होईल, याची जाणीव होणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. झाडं तोडून आम्ही पशूपक्ष्यांचंच अस्तित्व धोक्यात आणत नाही तर स्वत:चं देखील अस्तित्व धोक्यात आणत आहोत.
कधी कधी मी अस्वस्थ झालो, एखादा निर्णय घेणं कठीण जात असेल तर मी तलावाच्या काठी किंवा उंच पर्वतमाथ्यावर शांतचित्ताने बसून राहतो. जे काही मनात येतं ते येऊ देतो. निसर्गाच्या साक्षीनं घेतलेले सगळे निर्णय बरोबरच असतात, असा माझा स्वतचा अनुभव आहे. काही वेळानं आपोआप मनातला विषाद संपलेला असतो. काही वेळापूर्वी द्विधा मनस्थितीत असलेलं मन एखाद्या निर्णयाप्रत अगदी सहजपणे येऊन पोहोचतं. माझा हा ‘निसर्गयोग’ माझ्या मदतीला नेहमी धावून येतो. आपण सारे हा निसर्गयोग समजावून घेण्याचा प्रयत्न करून तर बघू यात, बघू या आपल्याला काय काय साध्य होते ते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा