नववर्षांच्या चैत्र पाडव्याच्या पहाटे संस्कृतीचा झेंडा खांद्यावर डोलवत पनवेलच्या शोभायात्रेला सुरुवात झाली. सामान्य पनवेलकर रविवारी शहराची परंपरा, संस्कृती आणि अध्यात्माचे महत्त्व सांगण्यासाठी घराबाहेर पडले. लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. वि. खं. विद्यालयाच्या प्रांगणातून या शोभायात्रेची सुरुवात झाली. नववर्ष स्वागत समितीने आयोजित केलेली ही शोभायात्रा सामान्य पनवेलकरांची असल्याचे चित्र या वेळी पाहायला मिळाले.
संस्कृती जतन करणारी बैलगाडी ही पनवेलच्या इतिहासाची ओळख असल्याने या शोभायात्रेचे नेतृत्व सजलेली बैलगाडी करीत होती. पारंपरिक पद्धतीने वाजणारे ढोल, ढोलाच्या तालावर थिरकणाऱ्या चिमुकल्यांनी पांढराशुभ्र सदरा, डोक्यावर गांधी टोपी या पोशाखात खांद्यावर भगवा फडकावीत या शोभायात्रेला सुरुवात झाली. आदिशक्ती असणाऱ्या मुलींच्या पथकाने ढोलांच्या ठेक्यावर झेंडय़ांच्या कवायती करून सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. जीवनात परमशांतीचा मार्ग हा आत्मशांतीने मिळतो हे सांगणारे फलक घेऊन समर्थन ध्यान केंद्राच्या साधकांनी आत्मशांती से विश्वशांती असा प्रचार या वेळी केला.
शोभायात्रेमध्ये चलचित्राचे महत्व असते. त्यामुळे घोडय़ांचा देखावा असणाऱ्या रथावर सीता-रामाची  व्यक्तिरेखा या वेळी साकार करण्यात आली. वयोगट कोणतेही असले तरीही उत्साह महत्त्वाचा असतो याच उक्तीप्रमाणे आदिवासी नृत्य सादर करणारे महिलांचे पथक या शोभायात्रेमध्ये सामील झाले होते. यामध्ये तरुण मुलींसह अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. मुलींनी साडी नेसून दुचाकींची काढलेली रॅली, त्यांच्या डोक्यावरील भगवे फेटे यामुळे दुचाकी रॅलीचा थवा पाहण्यासाठी पनवेलकरांनी गर्दी केली होती. सकाळी सात वाजेपर्यंत सावरकर चौकात शोभायात्रा येऊन धडकली होती. या दुचाकींच्या मागे शहरात कुटुंबांची बांधीलकी जपून शहराच्या समस्या सोडविण्यासाठी आणि सांस्कृतिक कामे करणारी संस्था सिटिझन युनिटी फोरम (कफ)चे शिष्टमंडळ या शोभायात्रेमध्ये सामील झाले होते. त्यानंतर सामान्य ग्राहकांच्या लुटमारीविरोधात न्यायिक हक्कांसाठी लढणाऱ्या जनजागृती मंचाने यामध्ये सहभाग घेतला होता. मुलींच्या लाठीकाठीच्या खेळांना पालक आणि विद्यालयांनी महत्त्व द्यावे यासाठी मुलींनी काठी फिरवत पांढऱ्याशुभ्र सलवारमध्ये या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.
अनेक जागृतीच्या ब्रिदवाक्यांचे फलक हातामध्ये घेऊन लक्ष्मी महाविद्यालयातील विद्यार्थी यामध्ये सामील झाले होते. रक्तदानाचे महत्त्व सांगण्यासाठी कच्छ युवक संघाने यात्रेचे नेतृत्व केले.  
या वेळी पनवेलच्या पहिल्या नागरिक नगराध्यक्ष चारुशीला घरत, त्यांच्या सहकारी महिला आणि आमदार प्रशांत ठाकूर आदी शोभायात्रेमध्ये सामील झाले होते. पारंपारिकतेची किनार असल्याने संस्कृती, ज्ञान आणि विश्वशांतीचा संदेश देणारी ही शोभायात्रा सामान्य पनवेलकरांना अजूनही आपलीशी वाटते. शोभायात्रा सावरकर चौकात आल्यावर नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांनी पुष्पवृष्टी केली. प्रत्येक चौकात शोभायात्रेची स्वागत करण्यासाठी सामान्य पनवेलकर झटतानाचे चित्र होते. यथाशक्तीप्रमाणे या नवीन वर्षांच्या स्वागतयात्रेचे स्वागत पनवेलकर करत होते. शहराची ओळख सांगणारी नववर्षांची शोभायात्रा अनेकांचा कौटुंबिक सोहळा बनली आहे. पनवेलची अत्यंत जुनी परंपरा म्हणून या शोभायात्रेकडे पाहिले जाते. मात्र कामानिमित्त पनवेलहून स्थलांतरित झालेली बरीचशी मंडळी या शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. त्यामुळे सकाळी पावणेसात वाजता सुरू झालेल्या स्वागतयात्रेमध्ये सुरुवातीला दोनशेजण होती. मात्र त्यानंतर दोन हजारांचा जनप्रवाह यात सहभागी झाला होता.  
कळंबोली, नवीन पनवेलमध्ये ज्येष्ठ नागरिकांची शोभायात्रा
कळंबोली शहरात ज्येष्ठ नागरिकांनी शोभायात्रा काढली. ही शोभायात्रा सकाळी नऊ वाजता सेक्टर १० येथील तरंग सोसायटीसमोर सुरू झाली. गेल्या सहा वर्षांपासून ही शोभायात्रा शहराचे आकर्षण बनली आहे. शहराला सांस्कृतिक चेहरा नसल्याने काही ज्येष्ठांनी आणि तरुणांनी गुढीपाडवा उत्सव समितीतर्फे हा उपक्रम सुरू केला आहे. शोभायात्रेमध्ये ज्येष्ठ नागरिक मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते.  ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह वाखण्याजोगा होता. हरिनामाच्या गजरात येथे वारकऱ्यांनीही शोभायात्रेची शोभा वाढविली. ट्रेलरवरील चलचित्र या यात्रेचे मुख्य आकर्षण होते. कळंबोली एसबीआय चौकातून मुख्य रस्त्यावरून भारत गॅस मार्गापर्यंत जाऊन पुन्हा एलआयजी मार्गाहून तरंग सोसायटीजवळ या यात्रेचा समारोप झाला.  नवीन पनवेलमधील सेक्टर १८ येथील रहिवाशांनी सिडको गणेश मंदिरापासून शोभायात्रा काढली. यामध्ये लहान मुलांनी सहभाग घेतला होता. हातातील झेंडा नाचवीत या मुलांनी आणि काही सामाजिक संस्थांनी यामध्ये सहभाग घेतला. ही शोभायात्रा गणेश मंदिर ते शबरी हॉटेलच्या चौकातून शिवा कॉम्पलेक्स येथून काढण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा