‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’ या वाक्याचा अर्थ महाराष्ट्रात कोणालाही समजावून सांगण्याची गरज नाही. पण सध्या एका ‘सरदार’च्या मदतीला एक मराठा न्यायालयीन लढाईत उतरला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘सन ऑफ सरदार’ या अजय देवगणच्या चित्रपटाची गळचेपी ‘यशराज फिल्म्स’च्या ‘जब तक है जान’ या चित्रपटाने केल्याचा ठपका ठेवत अजयने दिल्लीच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. याच ‘यशराज फिल्म्स’च्या ‘एक था टायगर’ने अभिजित घोलप यांच्या ‘भारतीय’ या चित्रपटाची वाट अडवली होती. हे लक्षात घेऊन अजय देवगणने ‘यशराज फिल्म्स’च्या मक्तेदारीविरोधात आता अभिजित घोलप यांचीही मदत मागितली आहे. विशेष म्हणजे घोलप यांनीही ही मदत देऊ केली आहे. यंदाच्या दिवाळीत अजय देवगण निर्मित ‘सन ऑफ सरदार’ आणि यशराज फिल्म्सचा ‘जब तक है जान’ हे दोन चित्रपट एकत्र प्रदर्शित होणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून मल्टिप्लेक्समध्ये जास्तीत जास्त स्क्रीन अडवून आपला चित्रपट प्रदर्शित करण्याचे डावपेच हिंदीतील बडे निर्माते लढवत आहेत. यशराज फिल्म्सने ‘एक था टायगर’ या आपल्या चित्रपटाच्या वेळीही हीच खेळी अवलंबून अभिजित घोलप यांच्या ‘भारतीय’ची मल्टिप्लेक्समधून हकालपट्टी केली होती. आताही ‘जब तक है जान’साठी अशाच प्रकारे स्क्रीन्स अडवून ‘सन ऑफ सरदार’ला धोबीपछाड घालण्याचा घाट यशराज फिल्म्सने घातला आहे. याबाबत अजय देवगण याने याआधीच नाराजी व्यक्त केली होती. यशराज फिल्म्सचा हा पवित्रा अत्यंत चुकीचा असून त्यामुळे अनेक छोटय़ामोठय़ा निर्मात्यांना चित्रपटसृष्टीत तग धरणे कठीण होऊन बसेल, असे अजयचे म्हणणे होते. यशराज फिल्म्सच्या या मक्तेदारीविरोधात अजयने दिल्लीच्या न्यायालयात धाव घेतली असून त्याने यशराज विरोधात मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. अजय देवगण यांच्या कार्यालयातून याबाबत आपल्याशी संपर्क साधला गेला. चित्रपटसृष्टीतील मक्तेदारीचा फटका आपल्याला याआधीच बसला असून त्याविरोधात कोणीही लढणार असेल, तर त्याला माझा पाठिंबा आहे. त्यामुळे या न्यायालयीन लढाईत आम्ही अजय देवगण यांच्याबरोबर आहोत, असे घोलप यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.घोलप आणि देवगण यांनी यशराज फिल्म्सच्या अघोषित मक्तेदारीविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. आता पुढील आठवडय़ात या खटल्याचे कामकाज न्यायालयात सुरू होणार आहे. एकाचे यश हे दुसऱ्याचे मरण ठरू नये. यासाठी हा खटला महत्त्वाचा असून त्याकडे आपले लक्ष असल्याचे घोलप यांनी स्पष्ट केले. तसेच या ‘कायदेशीर’ सहकार्यातून पुढे अजय देवगण यांच्यासह काम करण्याची संधीही आपण शोधणार असल्याचेही घोलप म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा