इमारत बांधण्यासाठी घेतलेल्या सात लाख रुपयांच्या कर्जवसुलीसाठी संबंधित बँकेने अंबरनाथ येथील एका मराठी शाळा इमारतीचा लिलाव केल्याप्रकरणी आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिली.
२०००मध्ये शिशुविकास संस्थेचे गोखले-रहाळकर शाळा इमारतीच्या बांधकामासाठी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सकडून सात लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. संस्था हे कर्ज फेडू न शकल्याने बँकेने शाळा इमारतीचा लिलाव केला. न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्ट रिसिव्हर एन.यू. ठक्कर यांनी १२ नोव्हेंबर रोजी शाळेच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले आहे. त्यामुळे शाळेतील ८७५ विद्यार्थी आणि २५ शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शनिवारी यासंदर्भात आमदार रामनाथ मोते यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची संबंधितांनी जिल्हाधिकारी पी. वेळारासू यांची भेट घेतली. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र कर्ज घेताना संस्था अथवा सूर्योदय गृहनिर्माण सोसायटीने जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सोसायटी तसेच संस्थेला नोटिसा बजावल्या आहेत. त्याआधारे न्यायालयात दाद मागणार असल्याचे रामनाथ मोते यांनी सांगितले.
अंबरनाथ शहरातील ही जुनी, दर्जेदार शाळा वाचविण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल, अशी ग्वाही शिवसेना कल्याण जिल्हा संपर्कप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली. त्यांच्यासह आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचाही शिष्टमंडळात समावेश होता.

Story img Loader