सत्तेचाळीसावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन यावर्षी ७ ते ९ डिसेंबर दरम्यान बारामती येथे होणार असून भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. दरवर्षी मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने ‘अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन’ आयोजित करण्यात येते. या वर्षी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान, स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी येथे हे अधिवेशन होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अधिवेशनाच्या समारोप समारंभाचे अध्यक्षीय भाषण करणार आहेत. यामध्ये विज्ञान संशोधक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. ‘राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे कार्य’ डॉ. अनिल काकोडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान शिक्षण, आरोग्य अशा विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत.