. हिंदी चित्रपटगीतांमध्ये प्रथमच या वाद्याचा वापर करण्यात आला. शिवकुमार शर्मा नावाच्या १८वर्षांच्या तरुणाने हे वाद्य वाजवलं होतं. कालांतराने पं. शिवकुमार शर्मा आणि त्यांच्या या वाद्याने काय इतिहास घडवला, हे सर्वज्ञात आहे. त्यांचा हा वारसा आता त्यांचा मुलगा राहुल चालवत आहे.
राहुलने संगीतबद्ध केलेला ‘काश्मीर- नेचर्स सिम्फनी’ हा अल्बम ‘टाइम्स म्युझिक’ने रसिकांपुढे सादर केला आहे. यात दोन लोकगीतांसह एकूण सहा गीते आहेत. राहुलचे बालपण काश्मीरमध्ये गेले असल्याने तेथील हिमशिखरे, तलाव, बगीचे आणि सुंदर लोक यांच्या रम्य आठवणी त्याच्या मनात आजही ताज्या आहेत. या स्मृतींना जागवत त्याने या संगीतरचना केल्या आहेत. ‘यार दोत नार खत’ या सूफी शब्दांतील लोकगीताने या अल्बमची सुरुवात होते. फाळणीमुळे मित्रांपासून दुरावलेला कवी (यालाच पश्चातबुद्धी असं म्हणतात..) आपल्या मित्राला साद घालतोय, उत्तुंग हिमशिखरांजवळ हे दु:ख व्यक्त करतोय, असा या गीताचा भावार्थ आहे. गुलजार गनी या गायकाने हे गीत अतिशय उत्कटतेनं गायलंय. ‘अश्कनी चास खून हरान’ हे आणखी एक लोकगीतही विरहाचंच दु:ख सांगणारं. व्यावसायिक सफाईचा स्पर्श नसल्याने या लोकगीतांतून काश्मीरच्या मातीचा अस्सल गंध दरवळतो!
‘ऑटम इन श्रीनगर’ या गीतात राहुलच्या संतुरने कमाल केली आहे. काहीसं फ्यूजनच्या अंगानं जाणाऱ्या या गीतामुळे चिनारचे डेरेदार वृक्ष आणि त्यांच्या पानगळीमुळे सोनेरी झळाळी लाभलेलं श्रीनगर डोळ्यांसमोर येतं. ‘चष्मे शाही आणि स्नो’ या गीतांमधूनही काश्मीरची विविध काल्पनिक रूपे सहज नजरेसमोर येतात. फिरदोस याचं ‘गर बार रुह-ए-जमीन अस्त, हामी अस्तो, हामी अस्तो, हामि अस्तो’ हे वचन प्रसिद्ध आहे. ‘पृथ्वीवर जर कोठे स्वर्ग असेल तर तो येथेच आहे, येथेच आहे, येथेच आहे’, असा याचा अर्थ आहे. या वचनाचा समावेश असलेल्या गीताने या अल्बमची सांगता होते. यातही संतुरचा अप्रतिम वापर करण्यात आला आहे. या सर्व गीतांमध्ये राहुलनेच संतुरवादन केलं आहे. याशिवाय सारंगी, मटका या वाद्यांमुळे या गीतांचं सौंदर्य खुललं आहे. कल्पनाचक्षूंनी काश्मीरची सहज सैर घडवणारा हा अल्बम संतुरचा गोडवा, नजाकत, वेगळेपण अधोरेखित करतो, यात शंका नाही.
सतरंगी
प्रसिद्ध सतारिये उस्ताद शुजात खान यांचा ‘सतरंगी’ या अल्बममध्ये लोकगीत, शास्त्रीय, फ्यूजन, सुफी, गजल, गीत आदी सात छटांची गीते ऐकण्यास मिळतात. सारेगम इं. लि. ची निर्मिती असलेल्या या अल्बमचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे जम्मूमधील डोग्री लोकगीते गाणाऱ्या पाखा गायकांचा समूहगायनासाठी केलेला कल्पक वापर.
‘सजनी सजनी’ हे पहिलंच गीत कमालीचं भावस्पर्शी झालं आहे. अझान खान यांचं संगीत असलेलं हे गीत शुजात खान यांनी अतिशय धीरगंभीर आवाजात व संयतपणे गायलं आहे. पाखा गायकांच्या कोरसचा यात अप्रतिम व प्रभावी वापर करण्यात आला आहे. या गीताचं काव्यही तितकंच उत्कट आहे. ‘सजनी सजनी आओगे हमे है यकीन’ या धृवपदानंतर येणारा ‘बैठे हुए है यादों मे तेरी सावन समेटे हुए, सोभी गए है ख्वाबोंमे तेरे पर तुम न मेरे हुए, समझ न आए क्यू खो गए है, चलना भी चाहे थमसे गए है, ये आसमाँ और जमीं’ हा अंतरा या खासच!
यानंतरचं ‘मेरे ख्वाजा मेरी जिंदगी’ हे गीतही श्रवणीय आहे. हे काव्य पारंपरिक असून तेही कमालीचं अर्थपूर्ण आहे. ‘मेरे ख्वाजा मेरी जिंदगी, सिर्फ कुर्बा है तेरे लिये, तू बना दे मिटा दे मुझे, ये तो आसाँ है तेरेलिये’ या धृवपदाच्या ओळी व सर्वच शेर गजलच्या अंगाने जाणारे, मात्र त्याला नेहमीप्रमाणे गजलचा स्वरसाज न चढवता सर्वसामान्य गीताच्या फॉर्ममध्ये स्वरबद्ध करण्यात आलं आहे. ‘ये बरसात की रात’ हे बिहारमधील लोकगीत तसंच ‘रुक बैलेरी आणि तूट गई बेडियाँ’
ही जम्मूमधील लोकगीतेही दाद देण्यासारखी उतरली आहेत. अल्बमच्या अखेरचं ‘मौला मौला’ हे गीत ऐकताना नौशाद यांच्या ‘इन्साफ की डगरपे बच्चो दिखाओ चलके’ (चित्रपट- गंगा जमुना) या गीताच्या चालीची आठवण येते. यातील शब्दही प्रभावी आहेत. ‘पलकों से गिर न जाए डरते है ख्बाब मौला, फिरभी तमन्ना कोई करते है ख्वाब मौला’ असं याचं धृवपद आहे. ‘इस उम्र के सफरने मुझे यही सिखाया, आहोंसे गिरके अक्सर मिटते है ख्वाब मौला’ हा शेर या गीताला वेगळ्या उंचीवर नेतो. शुजात खान यांचा सहभाग असल्याने या सर्वच गीतांमध्ये सतारीचा अतिशय परिणामकारक वापर करण्यात आला आहे. या सर्व गीतांच्या चाली खर्जातील असल्याने श्रोत्यांना एक वेगळीच स्वरानुभूती मिळते.
(समीक्षणासाठी सीडी-डीव्हीडी आमच्या नरिमन पॉइंट अथवा महापे कार्यालयात पाठवाव्यात.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा