एकीकडे व्यावसायिक नाटय़वर्तुळामध्ये मराठी रंगभूमी दिन साजरा होत असताना दुसरीकडे हौशी नाटय़कर्मी मात्र ‘ॠण काढून सण साजरा’ करत आहेत. राज्य नाटय़ स्पर्धाच्या प्राथमिक फेरीचा घंटानाद झाला असून या स्पर्धेत प्रायोगिक विभागात नाटक सादर करणाऱ्या संस्थांपुढे सध्या तालमींसाठीच्या जागेचा प्रश्न उभा ठाकला आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुंबई, ठाणे परिसरातील बहुतांश हौशी संस्थांकडे स्वत:ची हक्काची जागा नसल्याने ‘कोणी जागा देता का.’ असा सवाल करीत या नाटय़कर्मीची वणवण सुरू आहे.
नाटय़वर्तुळात ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ अतिशय धावपळीचा आणि लगीनघाईचा असतो. विविध पारितोषिक सोहळ्यांवर डोळा ठेवून अनेक नाटय़निर्माते आपली नाटके या तीन महिन्यांतच रंगभूमीवर आणण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरातील नाटय़गृहांचे तालीम हॉल या व्यावसायिक नाटकांच्या तालमींसाठी आरक्षित झाले आहेत. दरम्यान, याच काळात राज्य नाटय़ स्पर्धेच्या प्रायोगिक नाटकांची प्राथमिक फेरी असल्याने या स्पर्धेत सहभागी संस्थाही तालमीच्या जागेसाठी जंगजंग पछाडत असतात.
अशा संस्था अनेकदा एखाद्या वजनदार व्यक्तीची ओळख काढून जवळपास जागा उपलब्ध होते का, यासाठी प्रयत्न करतात. दरवर्षी नाटकासाठी जागा लागते म्हणून लग्नाच्या एका हॉलमालकाशी वर्षभर संधान साधून असतात, असे एका संस्थेच्या प्रतिनिधीने सांगितले. या दरम्यान लग्न नसतील, तर माफक दरात हॉल मिळतो. बऱ्याचदा असे हौशी कलाकार उन्हातान्हात सोसायटीच्या गच्चीवर किंवा छोटय़ाश्या हॉलमध्ये ‘स्टेजचा फील’ घेऊन तालमी करतात. उन्हात तालीम करताना दसपट श्रम पडतात, असे हौशी अभिनेता ओंकार तिरोडकर याने सांगितले.
गेल्या काही वर्षांमध्ये तालमींसाठी उपलब्ध असलेल्या जागांची संख्या कमी झाल्याचे निरीक्षण ‘द ट्रप’ या संस्थेच्या संकेत मोरे यांनी नोंदवले. याला दुजोरा देत युटोपिया कम्युनिकेशन्सच्या दिगंबर आचार्य यांनी उपलब्ध जागांच्या भाडय़ाबाबत चिंता व्यक्त केली. ताशी १५०-२०० रुपये भाडय़ाप्रमाणे दिवसभरात चार तास तालीम केली, तरी केवळ भाडय़ापोटी दिवसाचे ८०० रुपये खर्च होतात. त्याशिवाय चहापाण्याचा खर्च जोडला, तर दिवसाचे १००० रुपये खर्च आहे. दोन अंकी नाटकासाठी किमान २०-२५ दिवस सलग तालीम आवश्यक असते. नाटकाच्या तालमींसाठीच २५ हजार रुपये लागणार असतील, तर मग उर्वरित नाटक करायला पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न आचार्य यांनी उपस्थित केला.
या समस्येच्या आणखी एका अंगावर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या निखिल मोंडकर यांनी प्रकाश टाकला. दिग्दर्शक म्हणून काम करताना एकाच जागी सलग तालीम होणे आवश्यक आहे. मात्र दिग्दर्शकाचा बराचसा वेळ जागा शोधण्यात आणि इतर नियोजनात जात असेल, तर त्याचा परिणाम पूर्ण नाटकाच्या बांधणीवरही होऊ शकतो, असे मोंडकर म्हणाले.
गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाच्या प्रभावामुळे राज्य नाटय़ स्पर्धा किंवा तत्सम स्पर्धाची व्याप्ती वाढली आहे. या स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या संस्थांमध्येही वाढ झाली आहे. त्याच वेळी तालमीसाठी उपलब्ध असेल्या जागांमध्ये नृत्य प्रशिक्षण केंद्रे सुरू झाल्याने त्या हातच्या गेल्या आहेत. शाळांमध्ये तालमी करायच्या, तर शाळा सुटेपर्यंत वाट पाहावी लागते, असे संकेत मोरे सांगतात.
यावर तोडगा काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने तालीम हॉल बांधण्याची योजना आखली होती. मात्र ही योजना अद्याप तरी कागदोपत्रीच आहे. याबाबत अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे कार्यवाह दीपक करंजीकर यांना विचारले असता, सरकार बदलाची गडबड सुरू असल्याने आमच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. नाटय़ परिषदेच्या जागेबाबतचा आराखडा तयार आहे. आता नव्या सरकारसह चर्चा करून महिनाभरात हा प्रस्ताव मंजूर होईल, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader