जगाच्या पाठीवरील श्रेष्ठ लोकशाही आमच्या देशात आहे. सद्भावना जोपासत भारतभूमीचे वैभव कायम राखण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर असल्याचे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दुर्गापूर येथे स्वातंत्र्यदिनी आयोजित सद्भावना मॅरेथॉन स्पध्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामपाल सिंह, शहर सरचिटणीस किशोर जोरगेवार, जिल्हा परिषद सदस्य शांताराम चौखे, पंचायत समिती सभापती वर्षां ताजणे, लोकचंद कापगते, विनोद शेरकी, सूर्यकांत कुचनवार, शशिकला कापगते उपस्थित होते. या स्पध्रेचे उद्घाटन आमदार मुनगंटीवार यांनी मशाल पेटवून केले. या स्पध्रेला जिल्ह्य़ाच्या विविध भागातील स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या स्पध्रेचे अंतर दुर्गापूर एस.टी. वर्कशॉप दुर्गापूर अशा पद्धतीने ठेवण्यात आले होता. तीन गटात आयोजित या स्पध्रेत एकूण ५०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. युवकांच्या गटात विनोद चौहाण प्रथम, रनिश खाडीलकर द्वितीय, तर भारत राठोड तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. मुलींच्या गटात उषा लेडांगे प्रथम, प्रीती महाजन द्वितीय, तर भारती कन्नाके हिने तृतीय क्रमांक पटकाविला. प्रास्ताविक भाजयुमो तालुकाध्यक्ष फारुख शेख यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.