ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच शहरांमधील रस्त्यांची खड्डय़ांमुळे अक्षरश: चाळण झाली असल्याने धड चालणेही मुश्कील असताना सत्ताधारी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या हट्टपायी आयोजित केल्या जात असलेल्या  मॅरेथॉनमुळे अंबरनाथ-बदलापूरमधील हजारो विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी चक्क धावण्याचे दिव्य पार पाडावे लागणार आहे. वास्तविक रस्त्यांवरील खड्डय़ांचे प्रमाण पाहता यंदा ही मॅरेथॉन रद्द करणे अथवा पुढे ढकलणे योग्य ठरले असते. मात्र तितके सौजन्य ना या दोन्ही शहरांतील नेत्यांनी दाखविले ना जिल्हाप्रमुखांनी त्यांना तसे आदेश दिले. उलट शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे खड्डय़ांतून धावणाऱ्या मुलांचे कौतुक करण्यासाठी येणार असल्याची वर्दी देणारे फलक अंबरनाथ शहरात लावण्यात आले आहेत. अशा प्रकारचे फलक लावून सत्ताधारी शिवसेनेने खड्डय़ांमुळे झालेल्या जखमांवर मीठ चोळले असल्याची प्रतिक्रिया शहरवासी व्यक्त करीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून दहीहंडीबरोबरच मॅरेथॉनच्या माध्यमातून लोकप्रियता मिळविण्याचा उद्योग राजकीय मंडळी करू लागली आहेत. त्यातूनच ठाणे वर्षां मॅरेथॉनच्या धर्तीवर जिल्ह्य़ातील इतर शहरांमध्ये शिवसेनेच्या वतीने स्पर्धा घेतल्या जातात. यंदा ठाणे वर्षां मॅरेथॉन २५ ऑगस्ट रोजी आहे. कल्याण-डोंबिवलीतील स्पर्धा अद्याप जाहीर झालेली नसली तरी अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये स्वातंत्र्यदिनी ही स्पर्धा घेतली जाणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त हजारो मुलांना वेठीस धरून लोकप्रियता मिळविण्याच्या राजकीय नेत्यांच्या या हौसेविषयी दोन्ही शहरांमधील सर्वसामान्य नागरिकांमध्ये सध्या कमालीची नाराजी आहे. मात्र राजकीय नेत्यांविषयी भीतीयुक्त आदर वाटत असल्याने कुणीही त्यांच्याविरुद्ध जाहीरपणे ब्र उच्चारत नाहीत.

Story img Loader