पितृपक्षामुळे महाराष्ट्रातील राजकीय हालचाली मंदावल्या आहेत. मात्र, राज्यातील निवडणुकीत लक्षवेधून घेणाऱ्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएमने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी एमआयएमने मुंबईतील पाच जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती.
कमी काळात महाराष्ट्रातल्या राजकारणात चर्चेत आलेल्या एमआयएमने राज्यातील निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत काडीमोड घेतल्यानंतर एमआयएमने उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत मुंबईतील पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा एमआयएमने केली आहे. यात कुर्ला विधानसभा मतदारसंघातून ज्ञानू डावरे, वांद्रे पूर्वमधून मोहम्मद सलीम कुरेशी, अणुशक्तीनगरमधून शाहवाज सरफराज हुसेन शेख, भायखळ्यातून आमदार वारिस पठाण, तर अंधेरी पश्चिममधून अरिफ मोईनुद्दीन शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Praying for the success of our candidates from Aurangabad:
Aurangabad East: Dr Gaffar Quadri
Aurangabad Central: Mr Naser Siddiqui
Aurangabad West: Mr Arun Borde
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) September 27, 2019
मुंबईनंतर महत्वाचं शहर असलेल्या औरंगाबादमधील तीन जागांसाठी उमेदवारांची नावाची घोषणा केली आहे. औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील हे लोकसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर या जागेवर एमआयएम कोणाला तिकीट देणार याविषयी चर्चा सुरू झाली होती. त्यावरचा पडदा दूर झाला आहे. एमआयएमने नासेर सिद्दीकी यांना उमेवारी दिली आहे. त्याचबरोबर औरंगाबाद पूर्वमधून गफार कादरी यांनी उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद पश्चिमचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात एमआयएमने मागास कार्ड खेळलं आहे. संजय शिरसाठ यांच्याविरोधात अरूण बोर्डे यांना उमेदवारी दिली आहे.