विधानसभा निवडणूक लढवण्यावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी राजकीय सल्ला देत टीका केली होती. उरलीसुरली पत वाचवण्यासाठी अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढवू नये,”असं तावडे म्हणाले होते. त्याला अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचं ढोल बडवतो, पण त्यांना माझ्याविरोधात निष्ठावंत मिळत नाही,” असं चव्हाण म्हणाले.
नांदेडमध्ये भाजपाच्या मीडिया वॉर रुमचे उद्घाटनावेळी विनोद तावडे यांनी टीका केली होती. “लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले. त्यांनी आता आपली उरलीसुरली पत वाचवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवु नये,” असा सल्ला देत “राज्यातील कुठल्याही मतदारसंघात चव्हाण उभे राहिले तरी हरतील, अशी टीका तावडे यांनी केली होती.
मी निवडणूक लढवावी की नाही, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबाबत विनोद तावडेंच्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही.
भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ढोल बडवतो. पण माझ्याविरोधात त्यांना निष्ठावंत मिळत नाही आणि उमेदवार आयात करावा लागतो, याची तावडेंनी अधिक काळजी केली पाहिजे. pic.twitter.com/sasl7xRt5h— Ashok Chavan (@AshokChavanINC) September 24, 2019
विनोद तावडे यांच्या टीकेला अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चव्हाण म्हणाले, “मी निवडणूक लढवावी की नाही, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबाबत विनोद तावडेंच्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ढोल बडवतो. पण माझ्याविरोधात त्यांना निष्ठावंत मिळत नाही आणि उमेदवार आयात करावा लागतो. याची तावडेंनी अधिक काळजी केली पाहिजे,” अशा शब्दात चव्हाण यांनी तावडेंना सुनावले आहे.