जसजशी संक्रांत जवळ येऊ लागते, तसतसे अब्दुल गनी मनियार यांच्या घरातील लगबग वाढते. संक्रांतीला लागणारे ‘चुडे’ गनी यांच्या घरातील महिला तयार करतात. सौभाग्याचं लेणं म्हणून मकर संक्रमणादिवशी महिला हा चुडा घालतात. दरवर्षी लाखाचे चुडे विकूनच उदरनिर्वाह करणाऱ्या मनियार यांच्या घरातील महिला सौभाग्यासाठी जणू प्रार्थनाच करीत असतात. वर्षभरात चुडे विक्रीतून एक ते दीड लाख रुपयांची विक्री केली जाते.
आणखी वाचा – लहान मुलांचे बोरन्हाण का केले जाते? जाणून घ्या यामागचे कारण
विशेषत: लातूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि बीड या चार जिल्ह्य़ांमध्ये चुडा तयार करणे आणि विकणे हाच गनी कुटुबीयांचा मुख्य व्यवसाय आहे.
मकर संक्रमणाच्या दिवशी सौभाग्याचं लेणं म्हणून घातला जाणारा चुडा डांबर, लाख, रांजा, पिवळी माती, बेगड, रंग व काच यापासून तयार केला जातो. हे साहित्य गरम करून त्याचे मिश्रण तयार केले जाते. गोल कडे तयार करून चुडे बनविले जातात. चुडय़ामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. साधा चुडा, डांबरी चुडा, साधी पाटली, करवती पाटली, नामदेव गजरा, ठसा, काशी पाटली अशा विविध नक्षीकामांचे हे चुडे तयार करण्याचे काम शाहीन मनियार आणि फातिमा मनियार सहा महिन्यांपूर्वीपासूनच हाती घेतात. दररोज किमान ४०० ते ५०० चुडे त्या बनवितात. संक्रांतीला मागणी वाढते, हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या शहरातून किती मागणी येते त्यावर संख्या ठरविली जाते. कळंब शहरातील इंदिरानगर भागात राहणाऱ्या शाहीन आणि फातिमा या दोघींना याचीही जाणीव आहे की, आपला व्यवसाय असला तरी बऱ्याच जणींच्या श्रद्धा या चुडय़ात असतात. हिंदू धर्मातील सणांमध्ये लागणारा चुडा बनवताना घेणाऱ्या महिलांच्या सौभाग्याचे लेणे अल्लाहने जपावे, असे त्या आवर्जून सांगतात.