जिल्ह्यात शनिवारी रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा परतीचा पाऊस झाला. यामुळे माना टाकून देत असलेल्या खरिपाच्या पिकांना थोडाबहुत आधार मिळाला आहे. या पावसाने कुठल्याही कोरडय़ाठाक पडलेल्या जलसाठय़ांना कसलाही फायदा न झाल्याने जिल्हाभरात पाणीटंचाईचा प्रश्न कायम राहिला आहे. खरिपाची पिके वाचण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी पावसाची अपेक्षा आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी व शनिवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शुक्रवारी उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा या तालुक्यात चांगल्याप्रकारे पावसाने हजेरी लावली. अन्य तालुक्यात हा पाऊस झाला नव्हता. शनिवारी मात्र सर्व तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात का होईना बरसला. आकाशातील ढगाळ वातावरण पाहून शेतकऱ्यांना मोठा पाऊस पडेल असे वाटत होते. परंतु वाऱ्यामुळे मोठय़ा पावसाच्या अपेक्षेचे पाणी झाले. खरिपाच्या पेरण्या होऊन १५-२० दिवस झाले आहेत. त्यानंतर पेरणीनंतर मागील दोन दिवसांत झालेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना थोडासा आधार मिळाला असला, तरी हे पीक हाती पडण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसाने शेतात पाणी साचल्याचे दिसून येते. तसेच ओढय़ा-नाल्यातील खड्डेही पाण्याने भरल्याने चार दिवस का होईना जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याचे थोडके समाधान शेतकऱ्यांना मिळाले आहे. मात्र या पावसाने कुठल्याही जलसाठय़ाला लाभ झालेला नाही. परिणामी पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा