* भाजपचे रास्ता रोको
* शिवसेनेची निदर्शने
जसजसे ऊन वाढत आहे, तसतसे आंदोलनाची तीव्रताही वाढू लागली आहे. मराठवाडय़ात मंगळवारचा दिवस ‘आंदोलन दिन’ ठरावा, असेच वातावरण होते. दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी येथील विभागीय कार्यालयासमोर खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादसह मराठवाडय़ात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले, तर शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.
सकाळी अकराच्या सुमारास औरंगाबाद शहरातील सिडको बसस्थानक चौकात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. खासदार मुंडे यांच्या उपोषणास समर्थन देतानाच कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले, तर क्रांती चौकात शिवसेनेने अजित पवार यांच्या बेताल वक्तव्याची खिल्ली उडविली.
‘अजित पवार हाय-हाय’ असे फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केली.
बीड, उस्मानाबादेत निषेध
आमचे बीडचे वार्ताहर कळवितात की, मुंडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनामुळे प्रमुख रस्त्यांसह गावागावातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन केले. बीड शहरात जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, अॅड. सर्जेराव तांदळे, राजेंद्र बांगर यांसह कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली. उस्मानाबाद जिल्ह्य़ातही आंदोलन करण्यात आले. उस्मानाबाद शहरात कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. लोहारा, कळंब तालुक्यांतही आंदोलन करण्यात आले.
खासदार मुंडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोलीत भाजपच्या वतीने मंगळवारी आयोजित केलेल्या रास्ता रोको आंदोलनास संमिश्र प्रतिसाद मिळाला. या वेळी आंदोलन करणाऱ्या ८९ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले. हिंगोलीच्या नांदेड नाका, अग्रसेन चौकात भाजपचे जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या नेतत्वाखाली दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या तुलनेत पोलिसांची संख्या लक्षणीय होती. जालना येथील चंदनगिरा भागात जिल्हाध्यक्ष बबन लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. तासाभराच्या रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा