शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त येताच मराठवाडय़ात सर्वत्र दु:खाची छाया पसरली. सर्वच ठिकाणी प्रमुख बाजारपेठा बंद झाल्या. शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात आले. वर्दळीच्या ठिकाणी वाहतूकही रोडावल्याने अनेक रस्त्यांवर शुकशुकाट दिसू लागला.
औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची सत्ता आणण्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभांमुळे झालेली वातावरण निर्मिती चांगलीच साह्य़भूत ठरली. मुंबई, ठाणे, नाशिकपाठोपाठ औरंगाबादेत शिवसेनेने सत्तेवरील आपला वरचष्मा कायम राखला. औरंगाबाद शहरासह मराठवाडय़ात झालेल्या ठाकरे यांच्या सभांनाही वेगळेच वलय प्राप्त झाले होते. मराठवाडय़ाच्या मातीत बाळासाहेबांनी गाजविलेले विराट सभांचे फड सर्वाच्याच स्मरणात आहेत. बाळासाहेबांची सभा म्हणजे हमखास गर्दी आणि निवडणुकीतही त्याचे प्रत्यंतर याचे समीकरणच होऊन गेले होते. शनिवारी त्यांच्या निधनाचे वृत्त येताच औरंगाबाद शहरात शिवसैनिकांना मोठा धक्का बसला. शहराच्या गुलमंडी परिसरात सेनेचे नेते व कार्यकर्त्यांची गर्दी जमली. अनेक प्रमुख नेते आधीच मुंबईला रवाना झाले आहेत. आमदार किशनचंद तनवानी, नंदकुमार घोडेले यांच्यासह काही नेते येथेच असून शिवसैनिकांचे सांत्वन ते करीत होते. पैठण गेट, क्रांतिचौक भागतही शिवसैनिकांची गर्दी लोटली होती. व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद केली. वाहतूकही एकदम रोडावल्याने प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट होता.
चोख बोलीस बंदोबस्त
दरम्यान, पोलीस यंत्रणेने सर्व आवश्यक दक्षता घेतली असून महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त तैनात केला आहे. फिरते गस्ती पथकही सक्रिय असून पोलिसांच्या सुट्टय़ा व रजा आधीच रद्द केल्या आहेत. याशिवाय सर्व पक्षांचे, समाजाचे नेते यांच्या सहकार्याने शांतता व संयम टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.
उस्मानाबाद जिल्हा सुन्न
उस्मानाबाद – वर्षांनुवर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्य़ात शिवसेनेने मागील काही वर्षांत वेगळा ठसा निर्माण केला. शिवसेनाप्रमुखांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्हा सुन्न झाला. संध्याकाळी सर्व बाजारपेठ बंद ठेवून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी खासदार कल्पना नरहिरे व शिवाजी कांबळे यांनी श्रद्धांजली वाहिली. सेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.
हिंगोली – निधडय़ा छातीचा नेता, तसेच वादळी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया खासदार सुभाष वानखेडे यांनी व्यक्त केली. जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे, माजी खासदार विलास गुंडेवार, माजी आमदार गजानन घुगे यांनीही श्रद्धांजली वाहिली.
नांदेड जिल्ह्य़ात सन्नाटा
नांदेड – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त धडकल्यानंतर शहरासह जिल्ह्य़ात एकच सन्नाटा पसरला. असंख्य शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. अनेक भागात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद केली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री डी. पी. सावंत, प्रथम महापौर सुधाकर पांढरे, संपर्कप्रमुख प्रकाश कौडगे यांच्यासह अनेकांनी बाळासाहेबांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.
मराठवाडय़ात औरंगाबानंतर बाळासाहेबांचे नांदेडवर विशेष प्रेम होते. नांदेड एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. नांदेडमध्ये महापालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रथमच महापालिकेवर भगवा फडकला होता. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर ठिकठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद केली. तरोडा नाका, श्रीनगर, आयटीआय, वजिराबाद, महाराणा प्रताप चौक, सांगवी आदी भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. विश्व हिंदू परिषदेच्या नांदेड शाखेने बैठक घेऊन श्रद्धांजली वाहिली. जिल्हाध्यक्ष नवीनभाई ठक्कर, सुदेश पईतवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देशाचा महान सुपूत्र काळाच्या पडद्याआड गेल्याचे म्हटले आहे. नांदेडचे पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी वादळी झंझावात व्यक्तिमत्त्व निमाले, अशी प्रतिक्रिया दिली. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर नांदेड नगरीचे प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांना शोक अनावर झाला. ज्यांच्यामुळे मी नांदेड नगरीचा महापौर झाले ते ‘साहेब’ आता नाहीत हे मोठे शल्य आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना पांढरे यांनी व्यक्त केल्या. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे, नगरसेवक विनय गुर्रम, माजी जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, प्रकाश मारावर, माजी नगरसेवक उमेश मुंडे, बंडू खेडकर, दिलीप ठाकूर, महेश खोमणे यांनीही दु:ख व्यक्त केले.
बीडमध्ये बाजारपेठा बंद
बीड – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त येताच दुपारी चारनंतर शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद झाल्या. शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयासमोर शिवसैनिकांनी गर्दी केल्याने शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. सायंकाळी उशिरा बार्शी रस्त्यावर एस. टी. महामंडळाची बस फोडण्यात आल्याचे वृत्त आहे. शहरात सर्वत्र शांतता असून दु:खाचे सावट आहे. सेनेत बहुतांशी सेनेचे नेते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
शहरातील बहुतांशी सर्व बाजारपेठ व प्रमुख रस्त्यांवरील दुकानदारांनी दुकाने बंद करून श्रद्धांजली वाहिली. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांनी गर्दी केली. या वेळी अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. बार्शी रस्त्यावर सह्य़ाद्री हॉटेलसमोर एमएच १२ ७३८८ या गाडीवर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बीड हा शिवसेनेला मानणारा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. शिवसेनेचे तत्कालीन माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला. त्यानंतर माजी आमदार सुनील धांडे यांनी एकदा विधानसभेत प्रतिनिधित्व केले. प्रा. नवले शिवसेनाप्रमुखांच्या अत्यंत जवळचे मानले जात. त्यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांनी बीड शहरात दोन वेळा जाहीर सभा घेतल्या. अंबागोजागाईमार्गे लातूरकडे जात असताना दिवाकर रावतेंच्या आग्रहावरून दोन वेळा बाळासाहेबांनी परळी येथे शिवसेनेचे अभय ठक्कर यांच्याकडे विश्राम केला होता.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनामुळे मराठवाडा शोकाकूल
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त येताच मराठवाडय़ात सर्वत्र दु:खाची छाया पसरली. सर्वच ठिकाणी प्रमुख बाजारपेठा बंद झाल्या.
First published on: 18-11-2012 at 02:48 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathwada in grief