मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न हा केवळ समता व न्यायाचा नव्हता तर लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. मानवतावाद व लोकशाहीच्या रक्षणासाठी हा लढा होता, असे प्रतिपादन लाँगमार्चचे प्रणेते, माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी येथे केले. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अनिल वासनिक यांनी लिहिलेल्या ‘समतेसाठी..न्यायासाठी..नामांतर’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर लेखक अनिल वासनिक, उष:काल प्रकाशनचे रत्नाकर मेश्राम, रूपचंद्र गद्रे, माजी नगरसेवक शंकर तायडे, लीलाधर मेश्राम, अॅड. डी.बी. वानकर, युवराज फुलझेले उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात २७ जुलैला १९७८ रोजी एकमताने संमत झालेला नामांतराचा ठराव अमलात न आणणे म्हणजे लोकशाहीस नाकारणे होते. आंबेडकरी जनतेच्या त्यागातून, बलिदानातून नामांतराचा सुर्य उगवला. सर्वाच्या संघर्षांचे यश म्हणजे मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर होय. आंबेडकरी जनतेने गटातटांना विसरून नामांतरासाठी केलेली एकजूट यशस्वी ठरली. अशीच एकजूट निर्माण झाल्यास अनेक प्रश्न सुटू शकतील. नामांतर लढय़ाच्या काळात सरकारने वेळोवेळी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला तसेच सुरक्षा कायद्याखाली मला अटक केली, अशी माहिती प्रो. कवाडे यांनी दिली.
लढय़ात इतर परिवर्तनवाद्यांचाही सहभाग होता. या लढय़ाचा धावता आढावा अनिल वासनिक यांनी पुस्तकातून घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ऊर्जा घेऊन भीमसैनिक या लढय़ात उतरले होते. हीच ऊर्जा कायम ठेवून कार्यकर्त्यांनी एकमेकांशी समन्वय साधला पाहिजे, सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. तरच समाजाला एक दिशा मिळणे शक्य आहे, असे मत कवाडे यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना माजी आमदार उपेंद्र शेंडे म्हणाले, नामांतराचे श्रेय कुण्या एका व्यक्तीचे नसून सर्व समाजाच्या संघर्षांचे हे फलित आहे. कामगार नेते अशोक थूल यांनी नामांतर आंदोलन हे समतेचा लढा होता. सर्वानी तो लढवला. दलितांसारखे जे समदु:खी आहेत त्यांना सोबत घेवून एकत्र येवून प्रस्थापितांविरुद्ध लढा उभारण्याची गरज आहे, असे मत कवाडे यांनी व्यक्त केले. अॅड. विमलसुर्य चिमणकर यांचे याप्रसंगी अध्यक्षीय भाषण झाले.
नामांतर लढय़ात पोलिसांच्या लाठी हल्ल्यात अपंगत्व आलेले माजी नगरसेवक शंकर तायडे, गोळीबारात जखमी झालेले लिलाधर मेश्राम व लढय़ातील ज्येष्ठ कार्यकर्ते अॅड. सुरेश घाटे यांचा यावेळी जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनिल वासनिक यांनी पुस्तकामागील भूमिका विशद केली. प्रास्ताविक रत्नाकर मेश्राम यांनी केले तर अॅड. डी.बी. वानकर यांनी केले. राजकुमार वंजारी यांनी आभार मानले. प्रकाशनाला कवी इ.मो. नारनवरे, रामलाल सोमकुंवर, डॉ. शिवशंकर बनकर, अविनाश धमगाये, राजन वाघमारे, अरुण गायकवाड, शैलेंद्र वासनिक, गणेस उके, अनिल आवळे, अनिल बाराहाते, जगदीश पाटील, हुसेन फुलझेले, विलास भोंगाडे, ओमप्रकाश मोटघरे आणि अनिल मेश्राम आदी यावेळी उपस्थित होते.
मराठवाडा नामांतर लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न होता – प्रा. कवाडे
मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न हा केवळ समता व न्यायाचा नव्हता तर लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. मानवतावाद व लोकशाहीच्या रक्षणासाठी हा लढा होता, असे प्रतिपादन लाँगमार्चचे प्रणेते, माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी येथे केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-02-2013 at 03:05 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathwada nameing question is for as loksahi prof kavade