मराठवाडय़ातील नागरिकांनी आपल्या स्वभावातील दोष दुर करुन कला, साहित्य, समाजकार्य आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे, असे मत माहिती व जनसंपर्क विभागाच्या संचालिका श्रद्धा बेलसरे-खारकर यांनी नुकतेच येथे व्यक्त केले. मराठवाडा जनविकास परिषदेच्या स्नेहमेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी डेक्कन मर्चन्ट्स बँकेचे अध्यक्ष के.डी.मोरे, परिषदेचे अध्यक्ष प्रा. पंडित शिंदे, उपाध्यक्ष डॉ.अशोक नांदापूरकर अण्णासाहेब टेकाळे, एमएमआरडीएचे प्रमुख अभियंता तामसेकर आणि उपस्थित होते.
मराठवाडय़ातील नागरिक आपुलकीने वागणारे असले तरी स्वत:च्या भिडस्त स्वभावामुळे गुणवत्ता असूनही ते मागे पडतात, याबद्दल बेलसरे यांनी खंत व्यक्त केली. दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटेनेविषयी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आजच्या काळात महिलांनी समोर येणाऱ्या संकटांचा धैर्याने सामना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या शब्दकोशात ‘भीती’ हा शब्दच नसला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातून मुंबईत आल्यानंतरचा प्रवास के.डी.मोरे यांनी यावेळी उलगडला. मुंबईत आल्यावर येथे राहणाऱ्या आणि मूळचे मराठवाडय़ातील असलेल्या अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. खूप शिक्षण नसले तरी प्रमाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर पुढे येऊन चांगले यश संपादन करता येते असे त्यांनी सांगितले. यावेळी नांदेडचे  अभिजित अपस्तंभ यांचा शास्त्रीय गायनाचा झाला. त्यांना तबल्यावर भूषण परचुरे तर संवादिनीवर अभिषेक काठे यांनी साथ केली. कवी अशोक बागवे, नांदेडचे प. रत्नाकर अपस्तंभ यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. विजय सरोदे, संजय पोलसाने, पी.डी. कुलकर्णी यांनी मेहेनत घेतली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णासाहेब टेकाळे यांनी केले. शेवटी डॉ. अविनाश भागवत यांनी आभार मानले.

Story img Loader