मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्यातील फाटाफुटीमुळे १५ वर्षांपूर्वी सुंदरराव सोळंके यांच्याकडून गेलेले संस्थेचे नेतृत्व सोळंके यांचे चिरंजीव आ. प्रकाश सोळंके यांनी अजित पवार यांच्या संमतीने संस्थेच्या सभासदांची मोट बांधून आपल्याकडे खेचून आणले. विभागात शैक्षणिक आणि राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे असलेल्या या शिक्षण संस्थेच्या नव्या कार्यकारिणीत सोळंके यांच्यासह आ. अमरसिंह पंडित व सात सदस्य जिल्हय़ातील आहेत. यामुळे या संस्थेवर जिल्हय़ातील नेत्यांचे वर्चस्व वाढले आहे.
बीड जिल्हय़ातील माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके स्थापनेपासून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात सक्रिय होते. माजी मंत्री विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेत काम करताना १५ वर्षांपूर्वी संस्थेचे नेतृत्व सोळंके यांच्याकडे होते. याच काळात सोळंके यांनी जिल्हय़ात विशेष लक्ष घालून बलभीम व विधी महाविद्यालय, माजलगांवमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, गेवराई, अंबाजोगाई, धारूर या ठिकाणी महाविद्यालये स्थापन केली. तर ग्रामीण भागातही सादोळा, गंगामसला, सिरसाळा, हिवरा (गो.), कारी, परळी या ठिकाणी माध्यमिक विद्यालये स्थापन केली. मात्र संस्थेअंतर्गत सदस्यांची फाटाफूट झाल्यानंतर जिल्हय़ातील माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्यासह अनेकांनी मधुकरराव मुळे यांना साथ दिल्यामुळे संस्थेचे नेतृत्व त्यांच्याकडे गेले. काही दिवसांपूर्वी मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपद आ. सोळंके यांच्याकडे द्यावे, यासाठी जिल्हय़ातील नेत्यांनी मोच्रेबांधणी केली. आ. अमरसिंह पंडित, नूतन राज्यमंत्री सुरेश धस, माजी आ. धनंजय मुंडे यांनी सभासदांची जमवाजमव करून मधुकर मुळे यांना सरचिटणीसपदावरून हटवण्यात यश मिळवले. संस्थेच्या २१ सदस्यांच्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष प्रकाश सोळंके यांच्यासह सहचिटणीस म्हणून आ. अमरसिंह पंडित तर कार्यकारिणी सदस्य म्हणून माजी आ. बाबुराव आडसकर यांचे चिरंजीव मेघराज आडसकर, माजी खा. रामराव आवरगांवकर यांचे चिरंजीव अभिजीत आवरगांवकर, माजलगांव तालुक्यातील मिच्छद्र देशमुख (एम.टी.नाना), भारत साळुंके, नरहरी निर्मळ यांचा समावेश आहे. यामुळे या संस्थेच्या कार्यकारी मंडळावर जिल्हय़ातील नेत्यांचे वर्चस्व वाढले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा