इशरत जहाँप्रकरणी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. शिवाजी चौकात आंदोलन करणारे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. मतांसाठी दाढी कुरवाळण्याचा हा हिन प्रकार पवारांकडून सुरू असल्याची टिका आमदार क्षीरसागर यांनी यावेळी केली.     
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अलीकडेच इशरत जहाँ यांच्या भूमिकेची भलावण केली होती. त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी बुधवारी सायंकाळी मोर्चा काढला. मोर्चा शिवाजी चौकात आल्यानंतर शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. हिंदूंवरील अत्याचार व सैनिकांवरील हल्ल्याचे फलक उंचावित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे मध्यवर्ती ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले, अतिरेक्यांची पाठराखण करणाऱ्या पवारांनी पंतप्रधानाची स्वप्ने पाहू नयेत, इशरत जहाँ ही निष्पाप होती हे पवारांचे विधान बालिश स्वरूपाचे आहे. त्यातून त्यांनी दहशतवादाला प्रोत्साहन देण्याची व मतासाठी बांग देण्याची भूमिका घेतली आहे. मतासाठी दाढय़ा कुरवाळण्याचा हा प्रकार बंद करावा, अशी टिका त्यांनी केली. घटनास्थळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस आले. त्यांनी आमदार क्षीरसागर, धर्माजी सायनेकर, नगरसेविका स्मिता माळी, दुर्गेश लिंग्रज, तुकाराम साळोखे, जयवंत हरूगले, रमेश खाडे, धनाजी दळवी यांच्यासह शिवसैनिकांना अटक केली. रात्री त्यांची सुटका करण्यात आली.

Story img Loader