वैद्यकीय व्यवसायातील अपप्रवृत्तीविरुद्ध सोमवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. वैद्यकीय व्यवसायात वाढत चाललेल्या अपप्रवृत्तींचा पर्दाफाश करीत आंदोलकांनी डॉक्टर व औषध कंपन्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे मोर्चात काही औषध विक्रेतेही सहभागी झाले होते.
 वैद्यकीय व्यवसायात वेगवेगळ्या प्रकारची अपप्रवृत्ती वाढत चालली आहे, त्याविषयी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि औषध कंपन्या व डॉक्टर यांच्यातील मिलीभगत नष्ट व्हावी, यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार, विजय पाटील, बी.एस. मांगले, नंदकुमार गोंधळी, अप्पासाहेब धनवडे, जितेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यावर तेथे निदर्शने करण्यात आली. वैद्यकीय व्यवसायातील दलाली (कटप्रॅक्टिस) थांबवावी, डॉक्टरांनी स्वतच्याच, ठरावीक औषध दुकानांतून औषध खरेदीची सक्ती करू नये, औषध कंपन्यांकडील भेटवस्तूला भुलून ठरावीक कंपन्यांची औषधे घेण्यास सांगू नये आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात अशाप्रकारची अपप्रवृत्ती वाढत चालल्याने सर्व प्रकारच्या रुग्णांना त्याचा आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, असे त्यांनी या वेळी निदर्शनास आणून दिले. मोर्चात महिलाही लक्षणीय संख्येने सहभागी झाल्या होत्या.