शासनाने रोख अनुदान देण्याचा निर्णय मागे घेऊन पिवळ्या शिधापत्रिकेवर धान्य द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी इचलकरंजी येथील प्रांत कार्यालयावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चा प्रांत कार्यालयावर गेल्यावर आंदोलकांनी जोरदार निदर्शने करीत ठिय्या आंदोलन केले.
रोख अनुदानाचा निर्णय मागे घेऊन धान्य द्यावे, प्रत्येक कुटुंबाला वर्षांला १५ गॅस सिलिंडर टाक्या द्याव्यात, सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था भक्कम करून रेशन कार्डाचे वेगवेगळे प्रकार बंद करावेत, रेशनकार्डावर १२ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, महागाई कमी करावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. पक्षाच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्यमार्गाने फिरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यावर तेथे सभा झाली.
ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे, जिल्हा सचिव कॉ.दिलीप पवार, शहर सरचिटणीस हणमंत लोहार, कॉ.आनंदा गुरव, कॉ.रघुनाथ देशिंगे, कॉ.छाया नाईक, कॉ.नूरमहमंद बेळकुडे, कॉ.वैशाली कांबळे, कॉ.रघुनाथ तेजम आदींची भाषणे झाली. प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Story img Loader