सोलापूर जिल्ह्य़ातील माळढोक अभयारण्यासाठी शेतजमिनी संपादन करण्याची कार्यवाही, तसेच तीव्र दुष्काळात उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने स्वतंत्र मोर्चे काढले. माळढोकसाठी एक इंचही जमीन घेऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे उत्तर सोलापुरातील नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम ऊर्फ काका साठे यांनी दिला. करमाळा तालुक्यातही सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज माळढोक अभयारण्याच्या वाढीव क्षेत्रासाठी जमीन संपादनाचा भाग म्हणून दाव्यांच्या हरकती महसूल विभागाने मागविल्या आहेत. तालुक्यातील २३ गावांतील सुमारे २४ हजार हेक्टर जमिनीच्या खरेदी-विक्रीवर र्निबध घालण्यात आले आहेत. याविरोधात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या मोच्र्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र साठे, सोलापूर कृषी बाजार समितीचे संचालक अविनाश मरतडे आदींचा प्रामुख्याने सहभाग होता.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर त्याचे रुपांतर सभेत झाले. या वेळी बोलताना बळीराम साठे यांनी शासनाच्या कार्यपध्दतीवर चौफेर हल्ला चढविला. सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या कार्यशैलीवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. अभयारण्याच्या प्रश्नावर पालकमंत्री रस्त्यावर एक भाषा बोलतात आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत दुसरीच भाषा बोलतात. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या प्रक्रियेमुळे शेतकरी संकटात असताना पालकमंत्र्यांना त्याचे कसलेही गांभीर्य वाटत नसल्याची संतापजनक प्रतिक्रिया त्यांनी नोंदवविली, तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनीही, तीन वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्य़ात उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा या तालुक्यांवर माळढोक अभयारण्याच्या रुपाने आलेले संकट सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मध्यस्थी करून मिटविले होते. आताही या प्रश्नाने उचल खाल्ली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा व्यापक आंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे नमूद केले. जितेंद्र साठे यांनी माळढोक प्रश्नावर शासनाने शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला.
माळढोक व उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावर भाजपनेही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष,माजी खासदार सुभाष देशमुख, अक्कलकोटचे आमदार सिद्रामप्पा पाटील व पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी केले. चार हुतात्मा पुतळ्यांपासून निघालेल्या या मोर्चात हजारापेक्षा अधिक कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. अक्कलकोट तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संजीव पाटील, उत्तर सोलापूर तालुक्याचे इंद्रजित पवार, शहाजी पवार आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे झालेल्या सभेत सुभाष देशमुख यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीकास्त्र सोडले. माळढोक अभयारण्यासाठी वाढीव भूसंपादन करण्यास शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे. शासनाने विषाची परीक्षा घेऊ नये, असा इशारा त्यांनी दिला.
करमाळा तालुक्यातील ३८ गावांतून सुमारे ११ हजार २३७ हेक्टर जमीन माळढोक अभयारण्याच्या वाढीव क्षेत्रासाठी जाणार असल्याचे सांगितले जाते. या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. वाढीव जमिनी अधिगृहित करू नये म्हणून करमाळा तालुक्यातील जेऊर येथे करमाळा-टेंभुर्णी बाह्य़वळण रस्त्यावर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लोकभारतीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अजिनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे अॅड. शिवाजीराव मांगले, शेतकरी संघटनेचे परमेश्वर तळेकर व इतर विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा