शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी माजी आमदार पाशा पटेल लातूर ते औरंगाबाद दरम्यान पदयात्रा काढणार आहेत. दि. १९ सप्टेंबरला सुरू होणाऱ्या यात्रेचा समारोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती पक्षनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिली.
मुंडे यांनी पत्रकार बैठकीत पटेल यांच्या पदयात्रेची माहिती देताना सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका केली. मागील वर्षी दुष्काळ पडणार असल्याने उपाययोजना करण्याची मागणी ४ महिने आधीच केली होती. पण तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रयत्न सरकारने केला. परिणामी मराठवाडय़ाला पुरेसा निधी मिळाला नाही. त्यामुळे यावर्षीही आपण सरकारला वेळेवर जागे करीत आहोत, असे ते म्हणाले.
यंदा पाऊस चांगला झाला. विदर्भात ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. मराठवाडय़ात कापूस व सोयाबीन पिकांच्या लागवडीत मोठी वाढ झाली. आवक वाढली की भाव कोसळतात. त्यामुळे पीक येऊनही शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही. मराठवाडय़ात उसाचे उत्पादन २५ टक्क्यांनी घटले. परिणामी यंदा ७५ टक्के साखर कारखाने बंद राहतील. बीडमधील वैद्यनाथ व माजलगाव हे दोन कारखाने चालतील, अशी स्थिती आहे. सरकारने सोयाबीन, कापूस व साखरेवरील आयात शुल्क वाढविल्यासच शेतीमालाचे भाव स्थिर राहतील. अन्यथा शेतकरी पुन्हा अडचणीत येईल, असे सांगून पंतप्रधान मनमोहन सिंग यांची या संदर्बात भेट घेणार असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.
या प्रश्नांवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी पाशा पटेल १९ सप्टेंबरला लातूर येथून पदयात्रा सुरू करणार आहेत. लातूर, बीड, जालना व औरंगाबाद जिल्हय़ांतून ही यात्रा जाणार आहे. औरंगाबादला पक्षाध्यक्ष राजनाथसिंह समारोपास हजर राहणार आहेत. यात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष देंवद्र फडणवीस, भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा पालवे व आपण सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.