कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) पशुखाद्याचे दर कमी करावेत, या मागणीसाठी शेकाप, पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सोमवारी गोकुळच्या कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढण्यात आला. या मागणीसाठी २०० हून अधिक शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन केले. पशुखाद्यदराच्या मुद्यावरून आंदोलक व गोकुळच्या संचालकात जोरदार शाब्दिक वाद झाला. आंदोलकांनी आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशारा दिला.
 पशुखाद्याच्या दरामध्ये गोकुळने दरवाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी गेल्या आठवडय़ात संयुक्त बैठक झाली होती. मात्र ती निर्णयाअभावी फिस्कटली होती. त्यामुळे आंदोलकांनी सोमवारी गोकुळच्या कार्यालयावर शेतकरी व जनावरांसह मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता.     
गोकुळ शिरगाव येथील दूध संस्थेच्या कार्यालयावर सुमार ५० म्हशींसह शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. म्हशींच्या अंगावर शेतकऱ्यांनी गोकुळ दूध संस्थेकडून शेतकरी व जनावरांची कशी पिळवणूक केली जात आहे, हे दर्शविणारा मजकूर लिहिला होता. माजी आमदार संपतराव पवार, बाबासाहेब देवकर, प्रकाश चौगुले, आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. गोकुळमध्ये प्रवेश केल्यानंतर शेतकरी व कार्यकर्त्यांनी दरवाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तेथे उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये त्यांनी दिवसभर ठिय्या आंदोलन केले.     
गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे व संचालकांसमवेत आंदोलकांनी चर्चा केली. हुतात्मा अहिर दूधसंघाचे पशुखाद्य किमतीने कमी असताना गोकुळने दरवाढ करून शेतकऱ्यांच्या हिताविरोधात निर्णय घेतलाआहे, असा आरोप संपतराव पवार यांनी केला. तर अध्यक्ष डोंगळे यांनी गोकुळने जनावरांना इतर कोणत्याही संस्थेपेक्षा सर्वाधिक सुविधा व त्याही कमी किमतीत दिल्या असल्याचे सांगितले. शासनाने अनुदान दिले तर पशुखाद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा