शहरातील होमिओपॉथिक डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन दिले.
या डॉक्टरांच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. त्यांनी सांगितले, की गेल्या वर्षापासून संघटनेच्या मागण्या प्रलंबित आहेत. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी मध्यंतरी होमिओपॅथिक डॉक्टर व विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्यासह राज्य सरकारला या आश्वासनांचा विसर पडला असून त्यामुळेच संघटनेने पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
संघटनेने जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात होमिओपॅथी डॉक्टरांना कायमस्वरूपी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सरकारी नोकरी मिळावी, या शाखेसाठी स्वतंत्र संचनालय सुरू करावे, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीची निवडणूक प्रक्रिया दर पाच वर्षांनी राबवावी, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात या डॉक्टरांचा समावेश व्हावा, आयआरडीएअंतर्गत येणा-या विमा कंपन्यांच्या पॅनेलवर या डॉक्टरांची नियुक्ती करावी, आधुनिक औषधे वापरण्यास मान्यता द्यावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
त्याचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले. डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. अशोक भाजणे, डॉ. प्रमोद लंके, डॉ. महावीर गांधी, डॉ. रणजित सत्रे आदी या मोर्चात सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा