कोल्हापूर जिल्ह्य़ातील ग्रामरोजगार सेवक व मजुरांच्या प्रलंबित मागण्यांच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर जिल्हा ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या नेतृत्वाखाली १३ मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.    जिल्ह्य़ात ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम बऱ्यापैकी सुरू आहे. तथापि ग्रामरोजगार सेवक व मजुरांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यासंदर्भात संघटनेने निवेदने देऊन चर्चाही केली. मात्र शासकीय पातळीवर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे संघटनेच्या वतीने टाऊन हॉल येथून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हा परिषदेवर पोहोचल्यावर तेथे निदर्शने करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष प्रा.आबासाहेब चौगुले, प्रा.डॉ.सुभाष जाधव, प्रा.रघुनाथ पाटील, दिगंबर पाटील, सुनील देसाई, भगवान पाटील, दिनकर आदमापुरे, विलास कुंभार आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.    
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना निवेदन देण्यात आले. ग्रामरोजगार सेवकांना ओळखपत्र द्यावे, त्यांना ६ हजार रुपये वेतन द्यावे, हजेरीपत्रकाची सोय करावी, दर्जेदार प्रशिक्षण द्यावे, जॉब कार्डचे नूतनीकरण करण्यात यावे, रोजगार हमी योजनेस मजुरीचा दर किमान २०० रुपये असावा आदी मागण्या करण्यात आल्या. या संदर्भात ७ फेब्रुवारीस सविस्तर बैठक घेण्याचे आश्वासन म्हैसेकर यांनी दिले. तालुक्यातील पेडिंग बिले त्वरित देण्याचे त्यांनी मान्य केले.

Story img Loader