राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने गेल्या ५८ वर्षांपासून यात्रा भरविणारे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड हे देशातील एकमेव गाव असावे. यंदाही शुक्रवारी येथे गांधी यात्रेला प्रारंभ झाला. सोमवारी (दि. २७) यात्रेचा समारोप होणार आहे.
सन १९५४ मध्ये गावचे सरपंच शिविलग स्वामी व पोलीस पाटील चाँद पटेल यांच्या संकल्पनेतून या यात्रेची सुरुवात झाली. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त ही यात्रा भरवली जाते. शुक्रवारी गांधीजींच्या पुतळय़ाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या निमित्ताने पशुरोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. उद्या (शनिवारी) शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा होतील. सर्वरोग निदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. जि. प.चे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांच्या हस्ते पशुप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
प्रजासत्ताकदिनी गावातून प्रभातफेरी निघेल. शालेय विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात येईल. सोमवारी सकाळी संगीत गायनाचा कार्यक्रम व पशुप्रदर्शनात निवड झालेल्या पशुमालकांना बक्षिसांचे वाटप करण्यात येईल. दुपारी कुस्त्यांची स्पर्धा व रात्री नाटकाचे आयोजन केले आहे.

Story img Loader