इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढीच्या प्रश्नामुळे इचलकरंजीची औद्योगिक शांतता बिघडत चालली आहे. कामगारांच्या न्याय मागण्यांत लक्ष घालून हा प्रश्न मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवावा, अशी मागणी सोमवारी सायंकाळी सोलापूरचे कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम यांनी केली. तर दरमहा १० हजार रुपये वेतन मिळावे, या मागणीसाठी शहरातील यंत्रमाग कामगारांनी दुपारी सहकुटुंब मोर्चा काढला. दरम्यान कामगारांच्या प्रश्नाबाबत संयुक्त बैठक पुन्हा कधी होणार हे निश्चित नसल्याने यंत्रमागधारक व कामगार या दोन्ही घटकात अस्वस्थता पसरली आहे.
दररोज ४०० रुपये वा दरमहा १० हजार रुपये वेतन मिळावे या मुख्य मागणीसाठी इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आज सोमवारी या आंदोलनाला एक आठवडा पूर्ण झाला.
या प्रश्नी झालेल्या दोन्ही बैठका अयशस्वी ठरल्या होत्या. मागण्यांसंदर्भात आवाज उठविण्यासाठी सोमवारी यंत्रमाग कामगारांनी सहकुटुंब मोर्चा काढला. शाहू पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. शिवाजी पुतळा, शहापूर रोडमार्गे मोर्चा थोरात चौकात पोहचला. सहा यंत्रमागास आठ तासाला १० हजार रुपये पगार मिळावा, कामगार एकजुटीचा विजय असो, कामगारविरोधी धोरण अवलंबिणारे कामगारमंत्री व शासनाचा निषेध असो अशा घोषणा दिल्या जात होत्या.    
मोर्चा थोरात चौकात पोहचल्यावर तेथे सभेत रूपांतर झाले. कॉ.दत्ता माने, कॉ.भरमा कांबळे, शामराव कुलकर्णी, मिश्रीलाल जाजू, सचिन खोंद्रे, परशराम आगम, राजेंद्र निकम आदींची भाषणे झाली. सभेसाठी सोलापूरचे कामगार नेते, माजी आमदार कॉ.नरसय्या आडम यांना खास निमंत्रित करण्यात आले होते.
आपल्या विशिष्ट शैलीत बोलताना कॉ.आढम यांनी शासनाच्या कामगारविरोधी धोरणावर हल्ला चढविला. इचलकरंजीला वस्त्रोद्योगनगरी म्हणून लौकिक मिळवून देण्यास कामगारांचा मोलाचा वाटा असताना त्याला कसल्याही सुविधा दिल्या जात नाहीत. ५० हजार कामगार गेल्या आठ दिवसांपासून काम बंद आंदोलनात उतरले असतानाही शासन व कामगारमंत्री यामध्ये लक्ष घालण्यास तयार नाहीत. हा प्रश्न चिघळण्यापूर्वीच त्यातून मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. आताचा लढा क्रांतिकारी स्वरूपाचा असल्याने कामगारांनी आपली एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन करून सोलापुरातील यंत्रमाग कामगारांसाठीही लढा उभारणार असल्याचे आडम यांनी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा