मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या संघटनांचा १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष सुरेश पाटील यांनी बोलतांना दिली. तसेच फसवणूक करणाऱ्या शासनाला धडा शिकविण्यासाठी चंदगड विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशाराही या वेळी त्यांनी दिला. मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने आरक्षण प्रश्नी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीत पाटील यांनी हा इशारा दिला. पाटील म्हणाले,‘‘दोन मुख्यमंत्री व एका उपमुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द देऊनही फसवणूक केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन महिन्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, असे लेखी आश्वासन दिले होते. विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गतवर्षी २२ मे रोजी झालेल्या राज्यव्यापी बैठकीत स्वातंत्र्यदिनापूर्वी आरक्षण निर्णय जाहीर केला जाईल,असे सांगितले होते. त्याचे पालन तर केले नाहीच; उलट हिवाळी अधिवेशनात महसूलमंत्री नारायण राणे यांची समिती तीन महिन्यात निर्णय घेईल, असे घोषित केले होते, त्यालाही दोन महिने उलटले तरी अद्याप राणे यांना समिती नियुक्त केल्याचे पत्र दिलेले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा