केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेसह अन्य योजनांचे लाभ मिळावेत, बंद पडलेले लाभार्थीचे अनुदान पुन्हा सुरू करावे या मागणीसाठी हातकणंगले तालुक्यातील निराधार लाभार्थी नागरिकांनी सोमवारी इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.     
शासनाने गरीब, निराधार व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ या सारख्या अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. मात्र अनेक लाभार्थीचे अनुदान सन २०१० पासून अचानक बंद करण्यात आले आहे. नवीन अर्जदार पात्र असूनही तांत्रिक कारणे दाखवून अर्ज नामंजूर केले जात आहेत. तालुक्यातील ८ लाख लोकसंख्येपैकी ७० टक्के लोक दारिद्रय़रेषेखालील, बेघर निराधार असून केवळ दोन हजार नागरिकांना या योजनांचा लाभ मिळत आहे. त्यामुळे पात्र लाभार्थीना योजनेत समाविष्ट करावे वरखडलेले अनुदान सत्वर द्यावे या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात कोरोची, साजणी, रूकडी, चंदूर आदी गावांतील लाभार्थीचा समावेश होता.
मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यावर तेथे जोरदार निदर्शने करण्यात आली. शिवाजी पाटील, वसंत शिंदे, बाबासाहेब माणगांवे, शंकुतला जाधव, सुमन कुंभार यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांना निवेदन दिले. ठोंबरे यांनी गावनिहाय बैठका घेऊन पात्र लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा