विक्रमनगरातील उर्दू मराठी प्राथमिक शाळेच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. हिंदी है हम, हिंदोस्ता हमारा या संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात मुस्लिम नागरिकांचा समावेश होता. आंदोलकांना महापौर जयश्री सोनवणे व आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना निवेदन देऊन चर्चा केली. महापालिकेने दुरावस्थेत असलेल्या या शाळेचे स्थलांतरण न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
विक्रमनगर भागामध्ये उर्दू मराठी शाळा महापालिकेतर्फे चालविली जाते. सुन्नत जमात यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये ही शाळा भाडेतत्त्वावर चालविली जाते. तथापि या शाळेमध्ये अनेक गैरसोयी आहेत. शाळेत आठ वर्ग असले तरी ते दोन लहान खोल्यांमध्ये व पत्र्याच्या शेडमध्ये भरविले जातात. एका खोलीत तीन वर्ग भरविले जात असल्याने विद्यार्थ्यांना अवघडून शिक्षण घ्यावे लागते. परिणामी त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटली आहे. पाणी, वीज, मुतारी अशा प्राथमिक सुविधांचा अभाव आहे.
या संदर्भातील तक्रारी महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही त्याची कसलीही दखल घेतली नाही. त्यामुळे बुधवारी हिंदी है हम, हिंदोस्ता हमारा या संघटनेच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्यकर्ते, पालक व मुस्लिम नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. त्याचे नेतृत्व संघटनेचे सरचिटणीस हुमायुन हुरसल, गणी आजरेकर, अस्लम शेख, शब्बीर मुजावर, नगरसेवक आदिल फरास, माजी नगरसेवक काटे, माजी नगरसेवक बारगीर आदींनी केले.
महापौर सोनवणे व आयुक्त बिदरी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत शाळा बांधकामासाठी निधी व जवळच महापालिकेची जागा उपलब्ध असतानाही शाळेचे बांधकाम का केले जात नाही, असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला. गेली २० वर्षे या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. सुन्नत समाज सामाजिक कार्यासाठी बांधकाम करणार असल्याने महापालिकेने ती जागा रिक्त करून द्यावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.