प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील परिचरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या वतीने आरोग्याधिकारी डॉ.व्ही.डी.नांद्रेकर व बालसंगोपन योजना अधिकारी डॉ.कुंभार मॅडम यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. या मोर्चात जिल्ह्य़ातील सुमारे २०० हून अधिक परिचारिका उपस्थित होत्या.     
डॉ.नांद्रेकर व डॉ.कुंभार यांनी निवेदन स्वीकारून शिष्टमंडळाला सांगितले, की जिल्हा परिषद व्यवस्थापनाने परिचरांना दरमहा ३ हजार रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला असून तो शासनाच्या विचाराधीन आहे. तसेच अन्य मागण्यांसाठीही शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
या मोर्चाचे नेतृत्व परिचर संघटनेचे अध्यक्ष कॉ.बाबा यादव व सुशीला यादव यांनी केले. कॉ.दिलीप पवार, कॉ.रघुनाथ कांबळे, महादेव आवळे, शिवाजी शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच मोर्चात सुमन कुंभार, छाया बच्छे, निर्मला शिंदे, निर्मला परीट, सरस्वती कांबळे आदींसह मोठय़ा प्रमाणावर परिचर सहभागी झाल्या होत्या.