शहर महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या िभतीवर मोठय़ा अक्षरात केवळ उर्दू भाषेत नाव टाकल्यामुळे शिवसनिकांनी संताप व्यक्त करीत आमदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महापालिकेवर मोर्चाने धडक मारली. आयुक्त सुधीर शंभरकर यांना या वेळी घेराव घालण्यात आला. महापालिका परिसरात या वेळी मोठा बंदोबस्त होता.
मनपाच्या इमारतीवर मराठीसह उर्दू व इंग्लिश भाषेत नाव टाकण्याचा नियम आहे. त्याप्रमाणे महापालिका वाचनालय, शाळा व इतर इमारतींवर या तीन भाषांमधून नावे टाकली आहेत. परंतु काही दिवसांपूर्वीच काही इमारतींवर केवळ उर्दू भाषेत नाव टाकण्यात आले. १५ दिवसांपूर्वी शिवसेनेने मराठी व इंग्लिश भाषा डावलून केवळ उर्दू भाषेत नाव टाकल्यास आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला होता. मनपाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले.
अलीकडे मनपा मुख्य इमारतीच्या िभतीवर ठळक अक्षरात उर्दू भाषेत नाव टाकण्यात आले. त्यामुळे शिवसनिकांत संतापाची भावना पसरली. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी सकाळी आमदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसनिक महापालिकेवर धडकले. तेथे भगवा ध्वज फडकावत मनपाविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. आयुक्त शंभरकर आंदोलनकर्त्यांना सामोरे आले.
मनपा इमारती किंवा ग्रंथालयावर उर्दू भाषेत नाव टाकण्यास विरोध नाही. परंतु त्याचा क्रम मराठी, इंग्लिश व शेवटी उर्दू असा हवा, असे जाधव यांनी स्पष्ट केले. महापालिका मराठीला डावलून केवळ उर्दू भाषेत नाव टाकत आहे. कुठलाही शिवसनिक मराठीचा अवमान सहन करणार नाही व मनपा प्रशासनाची मोगलशाही चालू देणार नाही, असे त्यांनी आयुक्तांना ठणकावले. शहरात घाणीचे साम्राज्य आहे. अतिक्रमण वाढले. नळाला दूषित पाणी येते, याकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा लवकरच मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.
आंदोलनात जाधव यांच्यासह जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे, उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, तालुकाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, शहरप्रमुख रामप्रसाद रणेर, ज्ञानेश्वर पवार, मनपातील गटनेते अतुल सरोदे, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, संजय भंडारी, संजय सारणीकर आदींसह शिवसनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
१५ ऑगस्टनंतर अतिक्रमण हटाव
शिवसेनेचे आंदोलन चालू होण्याच्या एक तास आधी मनपाच्या वतीने उर्दू भाषेत टाकलेले नाव रंग फासून काढण्यात आले. तेथे मराठी, इंग्लिश, उर्दू भाषेतील छोटा फलक लावण्यात आला. पण दोन दिवसांपूर्वीच हे केले असते तर आजची वेळ आली नसती, या कडे आयुक्तांचे लक्ष वेधले असता, इमारतीच्या िभतीवर केवळ उर्दू भाषेत नाव कोणी टाकण्यास सांगितले, याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे उत्तर त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. शहरातील अतिक्रमणे हटविण्यास १५ ऑगस्टनंतर सुरुवात करण्यात येणार आहे. अतिक्रमण हटावपूर्वी शहरातील २६ रस्त्यांवरील मोजमाप पूर्ण करून मार्किंग टाकले आहे. १५ ऑगस्टनंतर नोटिस बजावून अतिक्रमण हटविले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा