माळशिरस घाटाच्या दरीत मृतदेह टाकला
दारू पिऊन आईला त्रास देणाऱ्या जन्मदात्या पित्याचा दोन मुलांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला व मृतदेह इंडिका मोटारीतून थेट ठाणे जिल्हय़ातील टोकेवाडी परिसरात माळशिरस घाटाच्या दरीत फेकून दिला. घटनेनंतर तिसऱ्या दिवशी पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी दरीतून मृतदेह शोधून आणला. दोन्ही मुलांविरुद्ध शुक्रवारी अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बाबासाहेब बापूराव दहिफळे (वय ५०, पांगरी, तालुका शिरूरकासार, जिल्हा बीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. मृत दहिफळे हे पत्नी मीराबाई व दोन मुलांसह या गावात राहात होते. मात्र, दहिफळे यांना दारूचे व्यसन होते. दारू पिऊन ते पत्नीला नेहमीच मारहाण करून त्रास देत. मंगळवारी (४ सप्टेंबर) रात्री दारू पिऊन पत्नीला मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेला त्यांचा मुलगा शरद (वय २४) व सतीश (वय २२) या दोघांनी वडिलांबरोबर वाद घातला. रागाच्या भरात शरदने धारदार शस्त्राने वडिलांवर वार केले. थोडय़ाच वेळात वडील मृत झाल्याचे लक्षात आल्यावर स्वत:च्या मोटारीतून (एमएच १२ एचझेड ११७७) डिक्कीत मृतदेह टाकून रात्रीतून ठाणे जिल्हय़ातील टोकेवाडी परिसरात माळशिरस घाटाच्या दरीत फेकून दिला. कोणाला संशय येऊ नये यासाठी दुसऱ्या दिवशी मृताची पत्नी व मुलांनी पोलीस ठाण्यात दहिफळे हरवल्याची तक्रार दिली. मात्र, अंमळनेर पोलिसांना या खूनप्रकरणाची कुणकुण लागली होती. त्यांनी मृताचा मुलगा व पत्नीची कसून चौकशी केल्यानंतर तिघांनीही खुनाची कबुली दिली.
संग्रहित लेख, दिनांक 9th Sep 2012 रोजी प्रकाशित
आईला त्रास देणाऱ्या पित्याचा दोन मुलांकडून निर्घृण खून
माळशिरस घाटाच्या दरीत मृतदेह टाकला दारू पिऊन आईला त्रास देणाऱ्या जन्मदात्या पित्याचा दोन मुलांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला व मृतदेह इंडिका मोटारीतून थेट ठाणे जिल्हय़ातील टोकेवाडी परिसरात माळशिरस घाटाच्या दरीत फेकून दिला. घटनेनंतर तिसऱ्या दिवशी पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
First published on: 09-09-2012 at 12:51 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marder craimedrinks