माहेराहून ५० हजार रुपये घेऊन न आल्याचा मनात राग धरून पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील प्रबोध नगरमध्ये घडली. या प्रकरणी पती अनिल नारायण कांबळे व मीना कांबळे या दोघा बहीण-भावांना नवा मोंढा पोलिसांनी अटक केली. औंढा तालुक्यातील जलालपूर येथील सुरेश रामभाऊ भडगळ यांची बहीण कंचना हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी प्रबोधनगरमधील अनिल कांबळे याच्याशी झाला. अनिल हा घरांना रंग देण्याचे काम करतो. गेल्या काही महिन्यांपासून अनिल पत्नी कंचनाला माहेराहून ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. गुरुवारी रात्री कंचना हिस अनिलने मारहाण केली व शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घरामध्येच कंचनाच्या गळ्याला दोर लावला.
यात कंचनाचा जागीच मृत्यू झाला. मृत कंचनाचा भाऊ सुरेश भडगळ यांच्या तक्रारीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात अनिल कांबळे व मीना कांबळे या दोघा भाऊ-बहिणीविरुद्ध विवाहितेचा छळ व खून या आरोपाखाली शुक्रवारी रात्री नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा पोलिसांनी या दोघांना अटक केली.

Story img Loader