ठाणे महापालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांच्या बोटचेप्या धोरणामुळे शहरात जागोजागी फेरीवाल्यांचे पेव फुटू लागले असतानाच महापालिका मुख्यालयाच्या समोरच मार्गर्शीष महिन्याचे निमित्त साधून विक्रेत्यांचा भलामोठा बाजार भरू लागल्याने अतिक्रमण विरोधी पथकाच्या बेपर्वाईने टोक गाठल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा तसेच आसपासच्या परिसरांतील पदपथांवर पूर्वीप्रमाणेच फेरीवाल्यांचा राबता सुरू होऊनही या अतिक्रमणावर महापालिकेची ‘असीम’ माया कायम आहे. असे असताना किमान मुख्यालय परिसर तरी फेरीवालामुक्त असावा, अशी अपेक्षा सर्वसाधारण ठाणेकर बाळगून होते. मात्र, मार्गर्शीष महिन्यात गुरुवारच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री करणारा मोठा बाजार मुख्यालयाच्या अगदी समोरच भरू लागला असून महापालिकेतील अधिकारीही या ‘भक्तिबाजारात’ रंगून गेल्याचे चित्र दिसू लागले आहे.
आर. ए. राजीव यांच्या बदलीनंतर ठाणे शहरात फेरीवाल्यांचा सुकाळ सुरू झाला असून रेल्वे स्थानक, महत्त्वाचे पदपथ, चौक, नाके असे सर्वत्र फेरीवाल्यांचे जथ्थे दिसू लागले आहेत. रेल्वे स्थानक परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या डोळ्यादेखत रोज नवे ठेले उभे राहात असून आयुक्त असीम गुप्ता यांच्या बोटचेपे कारभाराचे हे प्रतीक असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. ठाण्यातील पदपथ नागरिकांसाठी मोकळे राहावेत यासाठी राजीव यांनी अटोकाट प्रयत्न केले. यापूर्वी कधी झाले नाही एवढय़ा आक्रमकपणे पदपथ मोकळे करण्याच्या मोहिमा गेल्या तीन वर्षांत राबविण्यात आल्या. गुप्ता यांच्या काळात मात्र या मोहिमांवर पाणी फिरले असून अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांची भीड चेपू लागल्याचे चित्र गल्लीबोळांमध्ये दिसू लागली आहे. सर्वत्र फेरीवाल्यांचा सुकाळ असताना किमान मुख्यालय परिसर तरी फेरीवालामुक्त असावा, अशी सर्वसाधारण अपेक्षा असताना मात्र, पाचपाखाडी भागातील मुख्यालयासमोरच मार्गशीर्ष महिन्याचा बाजार भरू लागल्याने अतिक्रमण विरोधी पथक करते तरी काय, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी मांडली जाणारी पूजा महिलावर्गासाठी महत्त्वाची असते. वेगवेगळ्या प्रकारची पाच पाने, वेणी, फुले, पाच प्रकारची फळे असे साहित्य ही पूजा मांडताना लागते. गुरुवारच्या पूजेसाठीचे साहित्य विक्री करणारा खास बाजार मुख्यालयासमोर भरू लागला आहे. पदपथ अडवून, रस्त्याच्या कडेला भरणाऱ्या या बाजारामुळे या भागात वाहतुकीची कोंडी होऊ लागली असून याविषयी महापालिकेतील अतिक्रमण विरोधी पथक बघ्याची भूमिका घेऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्या भागातून असीम गुप्ता यांचा नियमित वावर असतो, त्याच ठिकाणी असा बेकायदा बाजार भरत असेल तर शहरातील इतर भागांत काय परिस्थिती असेल, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Story img Loader