मरिन ड्राइव्हच्या रस्त्याची दुरुस्ती व सौंदर्यीकरणाचे महत्त्वाकांक्षी काम हाती घेणाऱ्या पालिकेने दुभाजकांवर लावलेली लाखो रुपयांची रोपटी उन्हात करपली आहेत. सौंदर्यीकरणासाठी लावण्यात आलेल्या पेटुनिया या रोपटय़ाचे आयुष्य अवघ्या काही महिन्यांचे असतानाही पालिकेने नेमक्या कोणाच्या सल्ल्यावरून हा घाट घातल्याचे स्पष्ट झालेले नाही. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात सुकलेल्या या झाडांमुळे मरिन ड्राइव्ह रस्त्याचे सौंदर्यीकरणाऐवजी विद्रूपीकरण झाले आहे.
मरिन ड्राइव्हच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या रस्त्याचे बांधकाम गेल्या वर्षी सुरू झाले. या कामाअंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीसोबतच दुभाजकांवर फुलझाडे लावून सौंदर्यीकरण करण्याचेही अंतर्भूत होते. मात्र या ठिकाणी शहरातील इतर ठिकाणी लावलेली बारमाही झुडपे लावण्याऐवजी केवळ जानेवारी ते मार्च दरम्यान फुले येणाऱ्या पेटुनियाची रोपटी लावली गेली. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी अनेक रंगीबेरंगी फुलांनी रस्ता सुंदर दिसत होता. ही रोपटी विदेशी असून संकरित करून फुलांचे आकार, रंग बदलले जातात. साधारणत पावसाळ्यात बिया टाकून ही रोपटी येतात व थंडी पडल्यावर त्यांना फुले येऊ लागतात. मार्चपर्यंत फुले राहिल्यावर नंतर ही रोपटी सुकून जातात. त्यांचे आयुष्य एक वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांना पाणी, खत घालूनही ती जगत नाहीत, अशी माहिती वनस्पतीतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लट्ट यांनी दिली. मे महिन्याच्या सुरुवातीला ही रोपटी सुकून गेल्याने मरिन ड्राइव्हचा रस्ता विद्रूप दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे मरिन ड्राइव्हवर प्रायोगिक तत्त्वावर लावण्यात आलेली ही रोपटी शहराच्या इतर वाहतूक बेटांवर लावण्याचाही पालिकेचा विचार आहे.
मरिन ड्राइव्हच्या दुभाजकांवर लावलेली रोपटी बदलण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या आहेत. ही झाडे वर्षांतून दोन वेळा बदलली जाणार आहेत व त्याचा खर्च रस्त्याच्या कामामध्येच समाविष्ट करण्यात आला आहे. मरिन ड्राइव्ह रस्त्याचे सुशोभीकरण हे प्रायोगिक तत्त्वावर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नवीन प्रयोग केले जात आहेत, अशी माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी दिली.
नव्या प्रयोगाच्या नावाखाली लाखो रुपये खर्ची
बारमाही हिरवीगार राहणारी झुडपे, तामणसारखीच मात्र आकाराने लहान असलेली, विविध आकारातील कडू मेंदीच्या फुलांची रोपटी, बोगनवेल, कणेर ही झाडे रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी वापरली जातात अशी माहिती वनस्पतीतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लट्ट यांनी दिली. मात्र नवीन प्रयोगाच्या नावाखाली पेटुनियाच्या रोपटय़ांसाठी पालिकेने लाखो रुपये खर्ची घातले आहेत. पेटुनिया रोपटय़ांचे आयुष्य काही महिन्यांचे असते हे बागकामाची आवड असलेल्या अनेकांना माहिती आहे. केवळ वसंत ऋतूत शोभा वाढवणारी ही रोपटी त्यामुळे घरच्या गॅलरीतही अभावाने दिसतात. मात्र मरिन ड्राइव्हवर ही रोपटी लावताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कोणाचा सल्ला घेतला हे कळलेले नाही. रस्ता दुभाजकांसोबतच एलईडी दिवे बसवलेल्या विजेच्या खांबांवरही ही रोपटी लावण्यात आलेली आहेत. मात्र फेब्रुवारी-मार्चमध्ये लावलेल्या या रोपटय़ांची मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात पार रया गेली आहे. पाणी िशपडूनही या रोपटय़ांनी माना खाली टाकल्या आहेत.